Brinjal Farming : गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबत भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची चांगली शाश्वत उपलब्धता आहे असे शेतकरी बारा महिने विविध भाजीपाला पिकांची शेती करून चांगले उत्पन्न कमवत आहेत.
दरम्यान सध्या बाजारात टोमॅटो, वांगी, मिरची अशा जवळपास सर्वच भाजीपाला पिकांना चांगला विक्रमी बाजार भाव मिळत आहे. यामुळे भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही.
खरंतर, भाजीपाला पिकाला नेहमीच असा बाजार भाव मिळतो असे नाही कित्येकदा भाजीपाल्याला खूपच कवडीमोल दर मिळतो. पण जर बाजाराचा योग्य अभ्यास केला, कोणत्या कालावधीत कोणत्या भाजीपाल्याला बाजारात चांगला भाव मिळतो हे ध्यानात ठेवून जर भाजीपाला लागवड केली तर शेतकऱ्यांना भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड फायदेशीर ठरू शकते.
दरम्यान नांदेड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने अवघ्या 30 गुंठे जमिनीत वांग्याची लागवड करून तब्बल चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे मौजे जांभळा येथील प्रयोगशील शेतकरी निरंजन सरकुंडे यांनी ही किमया साधली आहे.
निरंजन यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे पाच एकर शेत जमीन असून ते या जमिनीत पारंपारिक पिकांची शेती करत आहेत. मात्र पारंपारिक पिकांच्या लागवडीतून त्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. यामुळे त्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरवले.
अशातच त्यांनी त्यांच्या शेजारील गावात काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकातून चांगले उत्पन्न कमवल्याचे पाहिले मग त्यांनीही भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या पाच एकर जमिनीपैकी 30 गुंठे जमीनीत म्हणजेच एका एकर पेक्षा कमी क्षेत्रात दोन बाय दोन या अंतरावर वांग्याची लागवड केली.
पिकाला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. यामुळे पाण्याचा अपव्यय टळला शिवाय पिक उत्पादनात देखील यामुळे वाढ घडून आली. पिकाचे योग्य नियोजन केल्यामुळे लागवड केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांना यातून उत्पादन मिळू लागले. त्यांनी उमरखेड आणि भोकर या त्यांच्या जवळील बाजारात वांग्याची विक्री केली.
बाजारात सध्या वांग्याला चांगला भाव मिळत असल्याने त्यांना या 30 गुंठे जमिनीतून जवळपास तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या वांगी पिकासाठी आत्तापर्यंत त्यांनी केवळ तीस हजार रुपयांचा खर्च केला आहे. निश्चितच कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळवत निरंजन यांनी इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक काम केले आहे यात शँकाच नाही.