Breaking Monsoon News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी ढगाळ हवामान, तर कधी गारपीट यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांमागील हे शुक्लकाष्ट खरीप हंगामात देखील कायम होते आणि आता रब्बी हंगामात देखील अशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.
दरम्यान बाजारात शेतकऱ्यांच्या शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे यामुळे शेतकरी बांधव मायबाप आम्ही जगायचं कसं हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित करू पाहत आहे. एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकट त्यामुळे बळीराजाच अर्थकारण पुरत कोलमडल आहे. सध्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा, कापूस, सोयाबीन या शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
अशातच राज्यात चार तारखेपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. विशेष म्हणजे काल राज्यातील उत्तर महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई रब्बी हंगामात निघेल अशी शेतकऱ्यांची आशा धुळीस मिळाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रमध्ये अवकाळी पाऊस कोसळत असून काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
रब्बी हंगामातील काढणीसाठी आलेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान तज्ञांकडून पावसाची शक्यता राज्यात वर्तवली जात आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ प्राध्यापक किरण कुमार जोहरे यांनी मुंबई तकला दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे वातावरण पुढील 4 ते 5 दिवस असच कायम राहण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर राज्यातील काही भागांमध्ये आणखी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज देखील त्यांनी यावेळी बांधला आहे.
जोहरे सांगतात की, वातावरणात असलेल्या अस्थिरतेमुळे गारपीटची शक्यता ही वाढत असते. सध्या उन्हाचा पारा वाढलेला असल्याने मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवन होत असल्याने पावसाचे ढगदेखील तयार होत आहेत. यामुळे सध्या अवकाळी कोसळत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. त्यांच्या मते, दिवसा गरम आणि रात्री थंडी जाणवत असल्याने वातावरणात अस्थिरता निर्माण होऊन पावसाचे ढग तयार होत आहेत. यामुळे पाऊस पडत आहे.
आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पुढील चार ते पाच दिवस भारतीय हवामान विभागाने अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, अमरावती या जिल्ह्यांत पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.