Bitter Gourd Variety : येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकरी बांधव खरीपात सोयाबीन, कापूस, तूर अशा विविध पिकांची लागवड करणार आहेत. शिवाय पावसाळी हंगामात भाजीपाला पिकांची देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड होते.
यामध्ये कारले या पिकाची देखील पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड होत असल्याचे चित्र आहे. कारले हे पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामामध्ये उत्पादित होणारे प्रमुख भाजीपाला पीक आहे.
कारल्याची उन्हाळी हंगामात लागवड करायची असेल तर जानेवारी ते मार्च या महिन्यात लागवड केली जाते. जर जास्त थंडी असली तर फेब्रुवारी महिन्यात कारल्याची लागवड करतात.
पावसाळी हंगामाबाबत बोलायचं झालं तर जून ते जुलै या हंगामात कारल्याची लागवड होते. यंदा देखील जून-जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कारल्याची लागवड होणार असा अंदाज आहे.
तथापि या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन जर मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला कृषी तज्ञांनी दिलेला आहे. त्यामुळे आज आपण कारल्याच्या काही सुधारित जातींची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कारल्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले प्रियंका, फुले ग्रीन गोल्ड, फुले उज्ज्वला व हिरकणी या कारल्याच्या जातींची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकणार आहे.
तसेच कोकण कृषी विद्यापीठ अर्थातच डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठणे विकसित केलेली कारल्याची कोकण तारा या जातीची देखील लागवड केली जाऊ शकते. शिवाय, केरळ कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या प्रीती आणि प्रिया यादेखील कारल्याच्या सुधारित जाती आहेत.
कारल्याच्या कोइमतूर लाँग,अर्का हरित, पुसा दो मोसमी, पुसा विशेष, सिलेक्शन ४,५,६ या जाती देखील प्रमुख कारले उत्पादक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहेत.
कारल्याच्या लागवडीसाठी हेक्टरी दीड ते दोन किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारल्याचे पीक लागवडीनंतर 60 ते 75 दिवसात परिपक्व होत असते, म्हणजे हार्वेस्टिंगसाठी तयार होत असते.
कारल्याची योग्य वेळी हार्वेस्टिंग करणे आवश्यक असते. हार्वेस्टिंगसाठी तयार झाल्यानंतर कारल्याची तात्काळ तोडणी करावी अन्यथा पीक खराब होते.