Bhartiy Havaman Vibhag Havaman Andaj : यंदा मान्सून काळातला पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांचा मुळावर उठला आहे. यावर्षी मान्सूनचे उशिराने आगमन झाले. उशिरा आला तर आला जून महिन्यात बरसलाच नाही. जून महिन्यात पाऊस झाला नाही यामुळे बहुतांशी भागात वेळेवर पेरणी होऊ शकली नाही.
तर काही भागात पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता तरीही पेरणी करण्यात आली. यानंतर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. जुलै महिन्यात राज्यातील कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याला पावसाने धु-धु धुतले. गेल्या महिन्यात पावसाची दमदार बॅटिंग झाली म्हणून जून महिन्यात जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता पुढे येणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते.
यामुळे गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस, तुर पिकासाठी खत दिले. काहींनी महागड्या औषधांची फवारणी केली. नासिक जिल्ह्यातील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता या अळीवर नियंत्रणासाठी अनेकांनी महागड्या औषधांची फवारणी केली आहे.
मात्र आता खरीप हंगामासाठी लाखो रुपयांचा खर्च करून झाल्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात, कोणत्याच गावात मुसळधार पाऊस झाला नाही. यामुळे खरिपातील खत दिलेली पिके आता माना टाकत आहेत.
खतांमुळे पिके लवकर करपू लागली आहेत. यामुळे राज्यात सर्वदूर पावसासाठी देव नवसला जात आहे. देवाकडे जोरदार पावसासाठी विनवणी केली जात आहे. मात्र यंदा वरुणराजाचा मूड बिघडलेला दिसतोय, कारण की भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यात जोरदार पाऊस होणार नाही असे सांगितले आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आगामी काही तास कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा चांगला जोर राहू शकतो असे देखील सांगितले जात आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील दोन दिवस हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे. या पावसामुळे संबंधित भागातील पिकांना जीवदान मिळणार अशी शक्यता आहे मात्र खरीप हंगामातील पिके पदरात पाडून घेण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी हा पाऊस पुरेसा राहणार नाही.
केव्हा बरसणार मोठा पाऊस?
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात हलका पाऊस पडेल. म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा देखील जोरदार पावसाचा राहणार नाही.
पण सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोठा पाऊस पडू शकतो. 8 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.