Bank Of Maharashtra News : अलीकडे शेत जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आपल्या देशात वाढत असलेली लोकसंख्या पाहता, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नागरिकीकरण पाहता शेत जमिनीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. लागवडी योग्य जमिनी कमी झाल्या असल्याने आपल्या देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.
अशा परिस्थितीत अनेक शेतकरी बांधव नव्याने शेत जमीन खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असतात. ज्यांच्याकडे शेतजमीन नसते ते भाडेतत्त्वावर शेती करतात. यामुळे भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतमजूर देखील शेतजमिनी घेण्यास इच्छुक असतात. मात्र शेतजमीन घेण्यासाठी आवश्यक भांडवल त्यांच्याकडे नसते.
पण, आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतजमीन घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मिळू शकणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया शेत जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देते. इतरही बँका शेतजमिनीसाठी कर्ज देतात. बँक ऑफ महाराष्ट्र देखील जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज देते.
दरम्यान आज आपण बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेत जमीन खरेदी करण्यासाठी किती कर्ज मिळते, यावर व्याजदर किती आकारले जाते, कोणाला कर्ज मिळू शकते ? यांसारख्या विविध बाबी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आवश्यक पात्रता
बँक ऑफ महाराष्ट्र पाच एकर कोरडवाहू जमीन किंवा अडीच एकर बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना नवीन जमीन खरेदी करण्यासाठी कर्ज मंजूर करते. याशिवाय अडीच एकर सिंचित जमीन म्हणजेच बागायती जमीन नावावर असेल आणि पाच एकर पर्यंतची जमीन भाडेतत्त्वावर कसत असेल असे शेतकरी देखील या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी पात्र ठरू शकणार आहेत.
एवढेच नाही तर शेतीची पार्श्वभूमी असणारे उद्योजक किंवा शेतीशी निगडित व्यवसाय करणारे उद्योजक या योजनेअंतर्गत शेतजमीन विकत घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहेत.
किती कर्ज मिळू शकते
बँकेकडून सदर विकत घेतल्या जाणाऱ्या जमिनीचे प्रथम मूल्यांकन केले जाते आणि यानंतर मग कर्जाची रक्कम ठरवली जाते. यांमध्ये विक्री कर, स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क जास्तीत जास्त 20.00 लाख रुपये इतकाच असेल असे ठरवून देण्यात आलेले आहे.
किती व्याजदर असेल
बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर 1 वर्षे MCLR + BSS @ 0.50% + 2.00% इतका व्याजदर आकारण्यात येणार आहे. तसेच 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर 1 वर्षे MCLR + BSS @ 0.50% + 3.00% इतका व्याजदर आकारला जाऊ शकतो.
कर्ज परतफेडीसाठी किती कालावधी मिळणार
बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेत जमीन खरेदी करण्यासाठी जर एखाद्याने कर्ज घेतलेले असेल तर त्याला सात वर्षांपासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीत कर्ज फेडावे लागणार आहे. कर्ज परतफेड करताना सहामाही किंवा वार्षिक हप्ता भरावा लागणार आहे.
कुठे अर्ज करावा लागणार
शेत जमीन खरेदी करण्यासाठी जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र कडून कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला भेट द्यावी लागणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेला भेट देऊन तुम्ही या कर्जाबाबत अधिकची माहिती जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला बँकेतच या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.