Banana Farming : राज्यात कांदा, कापूस, सोयाबीन बरोबरच फळ पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. द्राक्ष, डाळिंब, केळी, सिताफळ, पपई अशा विविध फळ पिकांची आपल्याकडे लागवड केली जाते. केळी बाबत बोलायचं झालं तर केळीची लागवड खानदेशात सर्वात जास्त होते.
खानदेशातील जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध असून येथील केळीला जीआय टॅग देखील मिळालेले आहे. दरम्यान आज आपण मराठवाड्यातील अशा एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने डोंगराळ जमिनीत केळीची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
विशेष म्हणजे डोंगराळ जमिनीत लागवड केलेल्या या केळीच्या पिकातून या शेतकऱ्याला तब्बल 22 लाख रुपयांची कमाई होणार असा अंदाज आहे. सुनील लक्ष्मणराव शिनगारे असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे.
बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील आरणवाडी सारख्या डोंगराळ भागात या युवा शेतकऱ्याने हा प्रयोग केला आहे. सुनील लक्ष्मणराव शिनगारे गेल्या दोन वर्षांपासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ते सातत्याने पीक पद्धतीत बदल करत आहेत. गेल्या दोन वर्षात त्यांनी भाजीपाला पिकातुन चांगली कमाई केली आहे. पण या चालू वर्षात त्यांनी केळी लागवडीचा प्रयोग केला आहे.
सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आधी तीन एकर जमिनीवर हिरवी मिरची लागवड केली होती. यातून १२३ मेट्रिक टन एवढे हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले.
त्यानंतर या क्षेत्रावर त्याने फुलकोबीतूनही चांगले पैसे कमवलेत. आता याच डोंगरावरील जमिनीत त्यांनी केळीची लागवड केली आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटी त्यांनी तीन एकरांत केळीची ३५०० रोपे आणून ७ बाय ५ अंतरावर लागवड केली आहे.
म्हणजेच केळी लागवड करून जवळपास सव्वा सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आणखी सहा महिन्यांनी त्यांना यातून उत्पादन मिळणार आहे. आतापर्यंत केळीचे पीक चांगले बहरले आहे. सध्या केळीचे पीक वीस फूट उंचीचे झाले आहे.
म्हणजेच केळीची चांगली वाढ झाली असून जर वातावरणात आगामी काळातही फारसा बदल झाला नाही तर त्यांना केळीच्या पिकातून चांगली कमाई होण्याची आशा आहे. त्यांनी जैन टिशू कल्चर या केळीच्या वाणाची लागवड केली आहे. या तीन एकर केळीच्या बागेतून त्यांना 180 मेट्रिक टन केळी उत्पादनाची आशा आहे.
आतापर्यंत या पिकासाठी त्यांना तीन लाखाचा खर्च आला असून यातून त्यांना जवळपास 22 लाख रुपयांपर्यंतची कमाई होईल असा अंदाज आहे. अर्थातच खर्च वजा जाता जवळपास 18 ते 19 लाख रुपयांची कमाई त्यांना होणार आहे. त्यामुळे सध्या या युवा शेतकऱ्याच्या प्रयोगाची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे.