Ativrushti Nuksan Bharpai : यावर्षी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाचा लहरीपणा चव्हाट्यावर होता. वाशिम जिल्ह्यात देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे 67 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच नुकसान झालं आहे.
परिणामी शासनाकडून संबंधित क्षेत्रावरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 51 लाख 28 हजार रुपयांची मदत शासनाकडून मंजूर झाली आहे.
तसेच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे जे काही जिल्ह्यात नुकसान झाले त्या नुकसानीच्या भरपाई पोटी संबंधित शेतकऱ्यांना 32 कोटी 77 लाख 31 हजाराची मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निधीचे वितरण शासन स्तरावरून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे.
यासाठी ऑनलाईन पद्धती म्हणजे एक विशिष्ट अशी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता जे बाधित शेतकरी असतील त्यांच्या याद्या तहसील स्तरावर तयार केल्या जातील. यामध्ये संबंधित बाधित शेतकऱ्यांचे नाव आणि खाते क्रमांक यांसारखी माहिती प्रविष्ट केली जाणार आहे.
याद्या तहसील स्तरावर तयार झाल्यानंतर त्या याद्या शासनाकडे वर्ग होतील. आणि मग ऑनलाईन पद्धतीने शासनाकडून सरळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची मदत वर्ग होणार आहे. निश्चितच वाशिम जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांचे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नुकसान झाले होते त्यांना आता नुकसान भरपाई ची मदत शासन स्तरावरून थेट बँक खात्यात मिळणार आहे.
यामुळे कुठे ना कुठे बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे यामुळे नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना देताना पारदर्शकता जोपासली जाणार असल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे.