Apple Farming In Maharashtra : अलीकडे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग यशस्वी झाले असून शेतकऱ्यांना या नवीन प्रयोगाच्या माध्यमातून चांगली कमाई सुद्धा होत आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या राज्यांमध्ये पिकवले जाणारे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवली आहे.
खरे तर सफरचंदाची व्यावसायिक शेती हिमाचल प्रदेश आणि काश्मीर या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. येथील हवामान या पिकाला विशेष अनुकूल आहे. परंतु अलीकडे देशातील इतरही राज्यांमध्ये सफरचंद लागवडीचा प्रयोग केला जाऊ लागला आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील अनेकांनी सफरचंद लागवड करून पाहिली आहे. यामध्ये अनेकांना यशही मिळाले आहे. थंड हवामानात वाढणारे हे पीक एका प्रयोगशील शेतकऱ्याने 40 ते 45 अंश सेल्सियस दरम्यान तापमान असणाऱ्या उष्ण भागात उत्पादित करून दाखवले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचूर येथील प्रयोगशील शेतकरी उज्वल पाटील यांनी ही किमया साधली आहे. खरेतर जळगाव जिल्ह्याचे नाव काढले की आपल्या डोळ्यासमोर केळीचे चित्र उभे राहते.
जळगाव जिल्ह्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र अलीकडे केळीचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाहीये. यामुळे या पिकाला पर्याय म्हणून उज्वल पाटील यांनी चक्क सफरचंद लागवड केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा प्रयोग सक्सेसफुल ठरला असून सध्या त्यांची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
या कामी उज्वल पाटील यांना त्यांच्या मुलांकडूनही मोठी मदत मिळाली आहे. त्यांची मुले बीएससी ऍग्रीचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या कृषी विषयातील ज्ञानाचा उज्वल पाटील यांना फायदा झाला आहे. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी हिमाचल प्रदेश मधून सफरचंद रोपे मागवलीत.
हिमाचल प्रदेश मधील एका नर्सरी मधून एचआर – ९९ या जातीची ३६५ रोपे त्यांनी मागवली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पाऊण एकर क्षेत्रात या सफरचंद रोपांची लागवड केली. म्हणजे जवळपास 16 ते 17 महिन्यांपूर्वी त्यांनी सफरचंद रोपांची लागवड केली.
विशेष म्हणजे त्यांना यातून उत्पादन देखील मिळू लागले आहे. पहिल्या वर्षीची हार्वेस्टिंग त्यांनी अक्षय तृतीया ला केली आहे. तसेच, त्यांनी सफरचंदाच्या पिकात आंतरपीक म्हणून पांढऱ्या कांद्याची लागवड केली होती.
तसेच या पिकात त्यांनी पेरूचे देखील आंतरपीक घेतले आहे. एकंदरीत जर काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर शेतीचा व्यवसाय देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो हेच पाटील यांचा उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.