Annapurna Yojana : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शिंदे सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळाले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत जमा केले जातील असे आश्वासन देण्यात आले आहे.
भाऊबीजेची ओवाळणी म्हणून राज्यातील लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबरच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिले जाणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केली आहे. या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना एका वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत भरून दिले जाणार आहेत.
याचा लाभ राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. मात्र ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे त्याच महिलांना याचा फायदा होणार आहे.
यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणारी असली तरी देखील यापासून अनेक जण वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच आता या योजनेच्या नियमांमध्ये मोठ्या बदल करण्यात आला आहे.
खरे तर आपल्या राज्यात बहुतांश गॅस जोडण्या घरातील पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतांनाही महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता सरकारने आदेशामध्ये सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र ठरविलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या नावे असलेली गॅस जोडणी स्वतःच्या नावे हस्तांतर केल्यावर त्या महिलेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असे नव्या आदेशात म्हटले गेले आहे.
त्यामुळे याचा राज्यातील असंख्य महिलांना फायदा होणार आहे. एकंदरीत, जर तुमच्या नावाने गॅस कनेक्शन नसेल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरातील पुरुष सदस्याच्या नावे असणारे गॅस कनेक्शन तुम्ही तुमच्या नावाने करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.