Ahmednagar Successful Farmer : अहमदनगर जिल्ह्याने सहकार क्षेत्रात गेल्या काही दशकांच्या काळात आपला ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला दिशा दाखवण्याचे काम केले आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पेरू पिकाच्या लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे वेगळेपण सिद्ध केले आहे.
वास्तविक, गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी शेतीची गत झाली आहे. याचा परिणाम म्हणून आता शेतकरी कुटुंबात जन्मास आलेले नवयुवक शेतकरीपुत्र शेती ऐवजी इतर उद्योगधंद्यांमध्ये आणि नोकरीमध्ये अधिक रस दाखवत आहेत.
मात्र असे असले तरी या प्रतिकूल परिस्थितीवरही काही शेतकऱ्यांनी यशस्वीरीत्या मात करून दाखवली आहे. यावर्षी कमी पाण्यामुळे शेतकरी बांधवांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपल्या महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या तब्बल 12 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यातील अनेक शेतकऱ्यांना यंदा पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु या विपरीत परिस्थितीमध्ये आणि दुष्काळी सालात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या आंबीखालसा येथील आयुब, रमजान व मुस्ताक सय्यद या तीन बंधूंनी पेरूच्या बागेतून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.
यामुळे सध्या सय्यद बंधूंची पंचक्रोशीत चर्चा पाहायला मिळत आहे. सय्यद बंधूंनी आपल्या एक एकर जमिनीत पिंक तैवान या पेरूच्या जातीची लागवड केली होती. सध्या या एक एकर पेरूच्या बागेची हार्वेस्टिंग सुरू असून आतापर्यंत त्यांना तीन तोडे मिळाले आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या पेरूला 83 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाला असून यातून त्यांना पाच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
सय्यद बंधूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तीन वर्षांपूर्वी पेरूची बाग लावली होती. एक एकरात बाग लावली आणि आठ ते नऊ महिन्यात त्यांना यातून उत्पादन मिळू लागले. पहिल्या वर्षी त्यांना पेरूच्या बागेतून पाच लाखांची कमाई झाली होती. दुसऱ्या वर्षी मात्र पेरूच्या बागेतून अपेक्षित असे उत्पन्न त्यांना मिळाले नाही.
यंदा पेरूच्या बागेचे तिसरे वर्ष असून यातून त्यांना आत्तापर्यंत पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत फक्त दहा टक्के माल निघाला आहे. या बागेतून आणखी 20 टन माल निघणे अपेक्षित आहे. यामुळे कमाईचा हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. खर्चाबाबत बोलायचं झालं तर आत्तापर्यंत साडेचार लाख रुपयांचा खर्च त्यांनी बागेसाठी केला आहे.
एकंदरीत आतापर्यंत झालेल्या कमाईतून त्यांचा खर्च सुटला आहे. आता जो 20 टन माल शिल्लक आहे तो त्यांचा निव्वळ नफा राहणार आहे. निश्चितच सय्यद बंधूंनी दुष्काळी सालातही पेरूच्या बागेतून लाखो रुपये कमवून इतरांसाठी मार्गदर्शक काम केले आहे यात शंकाच नाही. दुष्काळी सालात योग्य व्यवस्थापन करून अवघ्या एक एकर जमिनीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले असल्याने सध्या सय्यद बंधूंवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.