Ahmednagar Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनला आहे. मात्र शेतकऱ्यांनी शेतीमध्ये येणाऱ्या विविध आव्हानांचा यशस्वी सामना करत शेतीमधून चांगली कमाई करून दाखवली आहे. शेतकरी बांधव आता शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत देखील बदल केला आहे.
पिकाची फेरपालट देखील केली जात आहे. पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊस सारख्या प्रगत तंत्राचा वापर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता शेतीमधून चांगले उत्पादन मिळू लागले आहे. अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीचा व्यवसाय फायदेशीर बनवून दाखवला आहे.
अहमदनगर मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल केला असून यातून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.
या प्रयोगशील शेतकऱ्याने हिरवी मिरचीच्या पिकातून अवघ्या तीन महिन्यात चांगले दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवले असून त्यांनी उत्पादित केलेली मिरची थेट युरोपच्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे.
यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची पंचक्रोशीत विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामधील दहिगाव बोलका या गावातील प्रयोगशील शेतकरी आनंद मालकर यांनी ही किमया साधली आहे.
त्यांनी एक एकर जमिनीत शार्क वन जातीच्या मिरचीची लागवड केली. एक एकर जमिनीत त्यांनी पाच ट्रॉली शेणखताचा वापर केला. मिरची लागवड वरंबा पद्धतीने केली. यासाठी मल्चिंग पेपरचा वापर केला. योग्य पद्धतीने खत व्यवस्थापन केले.
पाण्याचे व्यवस्थापन हे पिकाची गरज ओळखून केले. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. मिरचीची लागवड त्यांनी जानेवारी महिन्यात केली होती. त्यांनी मिरचीसाठी मांडव उभारला होता.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिरचीची लागवड केली असून आता या मिरची पासून उत्पादन मिळू लागले आहे. 15 दिवसांपासून या मिरचीची तोडणी सुरू आहे. मिरचीच्या या पिकातून अवघ्या तीन महिन्यात उत्पादन मिळाले असून आत्तापर्यंत दोन टन एवढा माल निघाला आहे.
या पिकातून त्यांना आणखी सहा महिन्यांपर्यंत उत्पादन मिळत राहणार आहे. त्यांना यातून आणखी दहा ते अकरा टन माल मिळेल अशी आशा आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला 55 ते 60 रुपये असा भाव मिळतं आहे.
यासाठी त्यांना एक लाख रुपयांचा खर्च आला असून खर्च वजा जाता त्यांना लाखोंची कमाई होईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे त्यांची मिरची ब्रिटन सहित युरोपात निर्यात होत असल्याने त्यांना अधिकचा नफा मिळणार आहे.