Ahmednagar Success Story : 2019 च्या अखेरीस जगावर एक अदृश्य संकट आलं. कोरोना महामारीने जगात हाहाकार माजवला. या महामारीमुळे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली. उद्योगधंदे प्रभावित झालेत. विकसित देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला.
भारतातही या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता यामुळे भारताची अर्थव्यवस्था देखील थोड्या काळ डगमगली होती. या महामारीच्या काळात लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे बंद झालेत. अनेकांसाठी कोरोनाचा काळ आव्हानात्मक ठरला तर काही लोकांसाठी कोरोना हा दिशादर्शक ठरला.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे सुरेगाव येथील सागर धनाजी रोडे यांच्यासाठी देखील कोरोनाचा काळ दिशादर्शक ठरला आहे. खरतर, सागर यांनी बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पुण्याच्या चिखली भागात त्यांनी इंजिनिअरिंगचे वर्कशॉप सुरू केले.
व्यवसाय सुरू झाला, थोडाफार व्यवसायात जमही बसू लागला. मात्र अशा संपूर्ण जगावर एक अदृश्य संकट आले. कोरोनाच्या संकटाने सागर यांच्याकडून त्यांचा रोजगार हिरावून घेतला. कोरोनामुळे त्याला त्याचे दुकान बंद करावे लागले. व्यवसाय बंद झाला यामुळे गावाकडे येणे भाग पडले.
गावाकडे आल्यानंतर मात्र सागर यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय बंद झाला म्हणून काही काळ सागर निराश होता मात्र शेतीमध्ये आपण नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून काहीतरी वेगळे करू शकतो असा विश्वासही त्याला होता.
विशेष म्हणजे व्यवसाय बंद झाल्यानंतर शेती सुरू केली आणि पहिल्यांदाच कांदा पिकातून त्यांना सहा ते सात लाखांची कमाई झाली. यामुळे आपण निश्चितच काहीतरी नवीन करू हा त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. शेती करत असताना सागर याला त्यांच्या आई-वडिलांनी आणि त्याच्या धर्म पत्नीने मोलाची साथ दिली.
कांदा पिकातून चांगले उत्पादन मिळाले होते मात्र त्यांना फळबाग लागवड करायची होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी तैवान लाईट पिंक जातीच्या पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. याची रोपे त्यांनी आंध्र प्रदेश मधून मागवली. त्यांनी पेरूची 1800 रोपे मागवली आणि चार बाय नऊ फूट अंतरावर याची लागवड केली.
वर्षातून दोनदा या झाडांना फळधारणा होते. फळधारणा झाल्यानंतर काही अनावश्यक फळांना काढून टाकले जाते आणि जी फळे ठेवायचे आहेत त्यांना फोम किंवा प्लास्टिक कव्हर लावले जाते. यानंतर फळांची काढणी झाल्यानंतर बागेची छाटणी देखील करावी लागते.
दरम्यान त्यांनी या फळबागेसाठी विसापूर येथील तलावातून पाईपलाईन करून घेतली आहे. सागर यांनी सांगितल्याप्रमाणे, पेरूच्या या फळबागेसाठी त्यांना एका हंगामात दोन लाखापर्यंतचा खर्च करावा लागतो.
मात्र खर्च वजा करता त्यांना या पिकातून जवळपास 14 ते 15 लाखाची कमाई होते. यामुळे, कोरोना काळात व्यवसाय बंद पडला म्हणून गावी परतलेल्या या युवकाने शेतीमधून लाखो रुपयांची कमाई करून इतरांसाठी मार्गदर्शक असे काम केले असल्याचे बोलले जात आहे.