Ahmednagar Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी दबावात असलेले कांद्याचे बाजार भाव पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. यामुळे राज्यातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
खरंतर कांद्याला जुलै महिन्यात चांगला भाव मिळू लागला होता. जुलै महिन्यात कांद्याच्या दरात वाढ झाली आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याला विक्रमी भाव मिळू लागला. अशातच मात्र केंद्र शासनाने कांद्याच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक तुघलकी निर्णय घेतला.
केंद्र शासनाने कांदा निर्यात करण्यासाठी 40% शुल्क आकारण्याचे जाहीर केले. याचा परिणाम म्हणून देशातून होणारी कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली. यामुळे देशांतर्गत कांद्याचा साठा वाढू लागला. कांद्याची मागणी कमी आणि पुरवठा जास्त अशी परिस्थिती तयार झाली.
बाजाराच्या नियमानुसार ज्यावेळी कोणत्याही मालाचा पुरवठा जास्त होतो आणि मागणी कमी राहते त्यावेळी बाजारभावात मोठी घसरण होते. कांद्याच्या बाबतीत देखील असंच काहीसं घडलं आणि दरात मोठी घसरण झाली.
परंतु, उत्पादनात आलेली घट आणि बाजारात कांद्याची घटलेली आवक यामुळे पुन्हा एकदा दरात सुधारणा होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात देखील कांदा उत्पादकांसाठी समाधानकारक आहे. काल अर्थातच एक ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
राहता बाजारात कांद्याला काय भाव मिळाला
राहता कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एक ऑक्टोबर रोजी झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये कांद्याला कमाल 2800 रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. काल या एपीएमसी मध्ये 11910 गोण्यांची आवक झाली होती.
तसेच इथे 1 नंबर कांद्याला 2300 ते 2800 रुपये, 2 नंबर मालाला 1450 ते 2250 रुपये, 3 नंबरला 700 ते 1400 रुपये, गोल्टी कांद्याला 1500 ते 2000 रुपये आणि जोड कांद्याला 200 ते 600 रुपये असा भाव मिळाला आहे.
मात्र उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांद्याला सरासरी किमान तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला तर हे पीक परवडते नाहीतर पदरमोड करून या पिकाचा खर्च भागवावा लागतो असे सांगितले जात आहे. यामुळे आता भविष्यात बाजारभावात वाढ होते का हे पाहण्यासारखे राहणार आहे.