Ahmednagar Onion Rate : राज्यातील उत्तर महाराष्ट्रात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर हे दोन जिल्हे कांद्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. याव्यतिरिक्त धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात देखील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात देखील कांद्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते. एकंदरीत राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात कांदा या नगदी पिकाची लागवड पाहायला मिळते. राज्यातील जवळपास 70 ते 80% शेतकरी कांद्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. पण या पिकाने या चालू वर्षात शेतकऱ्यांना चांगलेच रडवले आहे.
या चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत कांद्याचा बाजार मंदित पाहायला मिळाला. बाजारात एवढी मंदी होती की शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील भरून काढता आला नाही. व्यापाऱ्यांनी तसेच बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळी कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात होणारी आवक आणि घटलेली मागणी तसेच बांगलादेश आणि श्रीलंकेत घटलेली निर्यात या सर्व पार्श्वभूमीवर कांद्याला कवडीमोल दर मिळाला.
मात्र आता गेल्या एक ते दीड महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे. दरम्यान काल झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी महत्त्वाच्या बाजारात कांद्याला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
काल जिल्ह्यात कांद्याला 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल भाव नमूद करण्यात आला आहे. कांद्याच्या बाजारभावाची तीन हजार रुपयांकडे वाटचाल सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून आता कुठे समाधान पाहायला मिळत आहे.
कोणत्या बाजारात मिळाला विक्रमी दर?
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार कालच्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला उच्चांकी 2800 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बाजारात 14,173 कांदा गोणींची आवक झाली होती. यात कांद्याला तीनशे रुपयांपासून ते 2,800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे.
जिल्ह्यातील इतर बाजारात काय आहे स्थिती
पारनेर व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतरही बाजारात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. यात श्रीरामपूर एपीएमसी मध्ये चांगल्या कांद्याला 1700 रुपये प्रति क्विंटल ते 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. संगमनेर मध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल ते 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला आहे. कोपरगाव एपीएमसी मध्ये चारशे ते दोन हजार रुपये, राहुरी एपीएमसी मध्ये 200 ते 2400 रुपये, अकोले एपीएमसी मध्ये 151 ते 2501 रुपये, संगमनेर येथे 200 ते 2600 रुपये असा भाव नमूद करण्यात आला आहे.