Ahmednagar Onion Rate : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कांद्याचे बाजारभाव पुन्हा एकदा वधारले आहेत. खरे तर निवडणुकीच्या आधी कांद्याला फारच कवडीमोल दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांना खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
मात्र निवडणुका झाल्यात आणि बाजारभावात खऱ्या अर्थाने सुधारणा झाली. महत्त्वाचे म्हणजे येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका आहेत. पुढल्या महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
मात्र असे असतानाही किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात करण्याच्या नावाखाली सरकारी हस्तक्षेप होत नाहीये. कारण की लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते आणि यामुळे केंद्रातील सरकारला निवडणुकीत नुकसान सहन करावे लागले.
हेच कारण आहे की केंद्रातील सरकारने यावेळी कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात बंदी करण्याऐवजी निर्यात बंदी उठवून आणि निर्यात बंदीसाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
यामुळे सध्या संपूर्ण देशभर शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत आहे. नगर जिल्ह्यातही कांद्याचे बाजार भाव सुधारले आहेत. नगर एपीएमसीच्या अंतर्गत येणाऱ्या नेप्ती उप बाजारात काल 14 सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावात कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे.
खरे तर गेल्या काही दिवसांपासून या बाजारात कांद्याला 25 ते 30 रुपये प्रति किलो असा दर मिळत होता. मात्र कालच्या लिलावात यामध्ये विक्रमी वाढ झाली. काल या एपीएमसी मध्ये कांद्याला 5500 रुपये प्रति क्विंटल असा कमाल दर मिळाला.
खरे तर 12 सप्टेंबरला झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये कांद्याला 4300 प्रतिक्विंटल ते 4500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. मात्र कालच्या लिलावात बाजारभावात आणखी सुधारणा झाली. काल नेप्ती उपबाजारात 27 हजार 627 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती.
बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, काल बाजारातील ढाकणे ब्रदर्स यांच्या आडतीवर प्रथम प्रतीच्या कांद्याला 5300 रुपयांपासून ते पाच हजार पाचशे रुपये पर्यंतचा दर मिळाला आहे.
इतर लिलावांमध्ये प्रथम प्रतीच्या कांद्याला 45 रुपये प्रति क्विंटल ते 5200 रुपये प्रति क्विंटल, दोन नंबर कांद्याला 3700 ते 4 हजार 500, तीन नंबर कांद्याला 2700 ते 3700 रुपये प्रति क्विंटल, चार नंबर कांद्याला पंधराशे ते 2700 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
नेप्ती उप बाजाराप्रमाणेच घोडेगाव बाजारातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. घोडेगाव बाजारात कांद्याचे दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. सरासरी बाजार भाव देखील चार हजार 700 ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत.