Ahmednagar News : मार्च महिना आता समाप्तीकडे वळला आहे. मार्च महिन्याची लवकरच एंडिंग होणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 संपून एप्रिल 2024 पासून आर्थिक वर्ष 2024-25 सुरू होणार आहे. मार्च एंडिंगमुळे सर्वत्र प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. या चालू आर्थिक वर्षातील प्रलंबित असलेली आर्थिक कामे आता पूर्ण केली जाणार आहेत.
शेतकरी बांधव देखील आपल्याकडील शेतमाल बाजारात विक्रीसाठी धावपळ करत आहे. शेतकऱ्यांना देखील मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर काही बाकी राहिलेले व्यवहार मोकळे करायचे आहेत.
त्यामुळे त्यांना पैशांची निकड आहे आणि हेच कारण आहे की शेतकरी बांधव आपल्याकडील सोयाबीन, कापूस, कांदा इत्यादी शेतमाल बाजारात घेऊन जात आहेत. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील नेप्ती उपबाजार समिती तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. 28 मार्च, 30 मार्च आणि 1 एप्रिल 2024 ला नेप्ती उपबाजार समिती मधील कांद्याचे लिलाव व सर्व प्रकारचे व्यवहार बंद राहणार आहेत.
मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर बँकांचे कामकाज बंद राहणार अन यामुळे बाजार समितीमधील लिलावावर याचा परिणाम होईल म्हणून हा निर्णय झाला असल्याची माहिती उपबाजार समितीच्या प्रशासनाकडून समोर आली आहे.
तथापि, 4 एप्रिल 2024 पासून नेप्ती उप बाजार समितीमधील सर्व प्रकारचे व्यवहार आणि कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने यावेळी प्रसार माध्यमांना दिलेली आहे.
या कालावधीत उपबाजार बंद ठेवावा अशी विनंती अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडते असोसिएशनकडून करण्यात आली होती. यासाठी असोसिएशनने बाजार समितीला तसेच जिल्हा हमाल पंचायतच्या अध्यक्षांना निवेदन सुद्धा दिले होते.
यामध्ये मार्च एंडिंगमुळे बँका बंद राहतील आणि यामुळे लिलावात अडचणी येऊ शकतात असे नमूद करण्यात आले होते. दरम्यान याच निवेदनाची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने बाजार तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी या सदर तीन दिवसांसाठी कांदा बाजारात विक्रीसाठी आणू नये असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
परंतु चार तारखेपासून लिलाव पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होतील असे सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यायची आहे.