Ahmednagar News : गेल्यावर्षी अर्थातच 2023 च्या खरीप हंगामात उत्पादित केलेल्या सोयाबीनला आणि कापसाला बाजारात अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. एक तर गेल्या वर्षी मान्सून मध्ये फारसा पाऊस झाला नाही आणि यामुळे कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. अधिकचा खर्च करून सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.
दुसरीकडे उत्पादित झालेल्या मालाला बाजारात फारसा भाव मिळाला नाही. अनेक बाजारांमध्ये मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च सुद्धा भरून काढता आला नाही. अशा परिस्थितीत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर उभे होते.
म्हणून गेल्या वर्षी ज्या-ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापसाची लागवड केली होती त्या शेतकऱ्यांना अनुदान रुपी मदत व्हावी अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
हे अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादित दिले जाणार असून किमान एक हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीस गुंठे किंवा वीसं गुंठ्यापेक्षा कमी जमिनीवर सोयाबीन आणि कापसाची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांना किमान एक हजाराचे अनुदान मिळणार आहे.
दरम्यान आता या अनुदानाचा पैसा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकरी पात्र आहेत. यापैकी 352,260 शेतकऱ्यांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, काल सोमवार (दि. 30) पासून शिंदे सरकारच्या वतीने अनुदान वाटपास सुरूवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात पात्र असणार्या शेतकर्याच्या बँक खात्यावर लवकरच अनुदान वर्ग होणार आहे. पण, जिल्ह्यात अद्याप 1 लाख 78 हजार 391 शेतकर्यांच्या खात्याची ई-केवायसी बाकी आहे.
यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होणार नाही. या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांच्या खात्यात पैसा येणार आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
खरेतर, जिल्ह्यात कापूस अनुदानासाठी 2 लाख 17 हजार 778 शेतकरी पात्र असून सोयाबीन अनुदानासाठी 3 लाख 12 हजार 780 शेतकरी पात्र आहेत. आता याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कालपासून अनुदानाची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली असल्याने जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यासहित संपूर्ण राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा मोठा दिलासा मिळणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात सरकारने अनुदानाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली असल्याने शेतकरी बांधवांचा यंदाचा विजयादशमी तसेच दिवाळीचा सण गोड होणार अशी आशा आहे.