Ahmednagar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान याच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे.
यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुद्धा पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. या अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात आधीच जमा झाले आहेत.
आता या योजनेच्या पात्र महिलांना पुढील हप्त्याची आतुरता आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. केंद्र सरकारची प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे याचा लाभ लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. अन्नपूर्णा योजनेचा लाभ अशाच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांच्या नावे गॅस जोडणी आहे. म्हणजेच गॅस कनेक्शन असणाऱ्या महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे.
तसेच कुटुंबातील फक्त एकाच महिलेला याचा लाभ मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजनेचे ३ लाख १७ हजार ५२२ लाभार्थी आहेत. यापैकी २ लाख ५१ हजार २७७ लाभार्थ्यांना एका सिलिंडरच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ११ लाख ३६ हजार ९४४ महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. यापैकी ६ हजार ६१६ महिलांचे अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे पडताळणीसाठी आले आहेत. अर्जाची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना याचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
अन्नपूर्णा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच गॅस सिलेंडरचे अनुदान वर्ग केले जाणार आहे. यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरे तर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच खूप बेजार झाली आहे.
गॅस सिलेंडर, खाद्यतेल, इंधनासहित सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पण आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. यामुळे महागाईने त्रस्त असणाऱ्या महिलांचे आयुष्य सुखकर होणार आहे.