Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता ही बातमी पाणी योजने संदर्भात आहे. अकोले तालुक्यात आणि पारनेर तालुक्यात एकूण पाच नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी साडेअठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अकोले तालुक्यातील तीन आणि पारनेर तालुक्यातील दोन नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्यात आली आहे. निश्चितच यामुळे संबंधित गावातील पाण्याचा प्रश्न समूळ नष्ट होण्यास मदत होणार आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी शासन निर्णय देखील पाणीपुरवठा विभागाने जारी केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पाणी मिळावे या अनुषंगाने राष्ट्रीय जल जीवन मिशन राबवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाच गावासाठी नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील खिरेविरे गावासाठी 4 कोटी 30 लाख 5 हजारांची, केळी ओतूर गावसाठी 4 कोटी 18 लाख 83 हजारांची व कोंभाळणे गावासाठी 2 कोटी 36 लाख 80 हजारांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे.
तसेच पारनेर तालुक्यातील खडकवाडी गावासाठी 3 कोटी 78 लाख 53 हजाराची व शिरापूर गावासाठी 3 कोटी 91 लाख 52 हजार रुपयांच्या पाणी योजनांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पूर्ण केली जाणार आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे ही योजना सुपूर्द केली जाईल.
विशेष म्हणजे जो कंत्राटदार प्रकल्पावर काम करेल त्याला योजनेचे काम झाल्यानंतर एक वर्ष ही योजना अविरतपणे चालू ठेवावी लागणार आहे. संबंधित ग्रामपंचायतीला देखील पाणीपट्टी वसुली नियमित करावी लागणार आहे.
निश्चितच अकोले आणि पारनेर तालुक्यातील या पाच गावातील पाण्याचा प्रश्न यामुळे सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या संबंधित गावातील जनतेची पाण्यासाठी वणवण पाहता निश्चितच ही योजना त्यांच्यासाठी वरदान सिद्ध होणार आहे.