Ahmednagar Kisan Credit Card News : किसान क्रेडिट कार्ड ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या अंतर्गत शेतकरी बांधवांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. व्याजदर कमी असल्याने शेतकरी बांधव या योजनेअंतर्गत कर्ज घेऊन शेतीसाठी आवश्यक भांडवल उभारणी करत आहेत. निश्चितच मोदी सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभप्रद असून दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक असल्याने या योजनेचा देशभरात मोठ्या प्रमाणात अंमल केला जात आहे.
मात्र अहमदनगर जिल्ह्यातून किसान क्रेडिट कार्डच्या अंमलबजावणीबाबत एक मोठी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सरकारी बँकांनी किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्यासाठी आखडता हात घेतल्याचे चित्र समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यात केवळ युनियन बँक ऑफ इंडियाने किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी आपले होत मोकळे सोडले आहेत.
या बँकेकडे आलेल्या 22,893 अर्जांपैकी 22,765 अर्जांना हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील इतर बँकांकडे 100-200 अर्जच दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या इतर बँकांनी या प्राप्त झालेल्या अर्जांना देखील खोडा लावला आहे, यापैकी बहुतांशी अर्ज सदर बँकांनी फेटाळले आहेत.
यामुळे किसान क्रेडिट कार्ड ही योजना शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची असली तरी देखील तिच्या अंमलबजावणी बाबत अहमदनगर जिल्ह्यातून ऊदासीनता स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. यामुळे शासन दरबारी शेतकरी हिताच्या अनेक कल्याणकारी योजना असल्या तरी देखील त्याचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्याला मिळतो का? यानिमित्ताने हा प्रश्न अजूनच गहन झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात क्रेडिट कार्डसाठी बँकाकडे प्राप्त झालेले अर्ज आणि बँकांनी स्वीकृत केलेले अर्ज याची यादी खालीलप्रमाणे :-
बँक | KCC साठी प्राप्त अर्ज | मंजूर अर्ज | नामंजूर अर्ज | |
युनियन बँक | 22,893 | 22,765 | 128 | |
बडोदा बँक | 50 | 50 | ||
इंडिया बँक | 29 | 27 | 2 | |
महाराष्ट्र बँक | 101 | 48 | 53 | |
कॅनरा बँक | 27 | 22 | 5 | |
सेंट्रल बँक | 148 | 54 | 94 | |
आयडीबीआय बँक | 4 | 4 | ||
स्टेट बँक | 768 | 746 | 22 | |
इंडियन बँक | 17 | 17 | ||
इंडिया ओवसीस बँक | 6 | 6 |
निश्चितच महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगरमध्ये किसान क्रेडिट कार्ड बाबत मोठं उदासीन असं धोरण बँकांकडून स्वीकृत करण्यात आल आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुपटीने कसं वाढणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरील आकडेवारी पाहिली तर फक्त युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज देखील स्वीकृत केले आहेत.
मात्र जिल्ह्यातील इतर बँकांचा विचार केला असता शेतकऱ्यांनी अर्ज देखील कमी प्रमाणात केले आहेत आणि स्वीकृती देखील खूपच नगण्य आहे. शेतकरी बांधव यासाठी बँकांकडून सिबिलची विचारणी होत असल्याचा आरोप करत आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली किसान क्रेडिट कार्डची योजना अहमदनगर जिल्ह्यात डेबिटमध्ये सुरू आहे.