Ahmednagar Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबवले आहेत. विशेष म्हणजे या नवनवीन प्रयोगातून शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होत आहे. अहमदनगर मधील अकोले तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील असाच एक नवखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
तालुक्यातील टाकळी येथील शेतकरी प्रसन्ना धोंडगे यांनी उत्तर भारतात प्रामुख्याने पिकवल्या जाणाऱ्या काळ्या गव्हाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. विशेष म्हणजे धोंडगे यांनी यशस्वी करून दाखवलेला हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे म्हटले जात आहे.
यामुळे सध्या धोंडगे यांची पंचक्रोशीत चांगलीचं चर्चा पाहायला मिळत आहे. खरंतर धोंडगे यांच्या आई-वडिलांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे. दरम्यान त्यांनी काळा गहू या आजारावर गुणकारी असल्याचे वाचले होते. त्यामुळे त्यांनी या गव्हाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
याचे बियाणे कुठे मिळते याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे राहत असलेल्या आपल्या एका मित्राच्या माध्यमातून त्यांनी पंजाब मधून काळ्या गव्हाचे बियाणे मागवले. त्यांनी 550 रुपयांना पाच किलो बियाणे खरेदी केले.
या बियाण्याचा वापर करून त्यांनी दोन गुंठे क्षेत्रात याची पेरणी केली. आता त्यांना यापासून चांगले दर्जेदार उत्पादन मिळाले आहे. दोन गुंठ्यात लागवड केलेल्या या गव्हातून त्यांना 45 किलो एवढे उत्पादन मिळाले आहे.
यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असून त्यांनी आता काळ्या गव्हाची लागवड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर काळ्या गव्हाची लागवड ही मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये अधिक केली जाते.
हा गहू मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असून याचे सेवन केल्यास आरोग्य सुदृढ राहते. यामुळे बाजारात या गव्हाला अधिकचा भाव मिळतो. सध्या काळा गहू बाजारात 70 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे.
यामुळे काळा गहू लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असा विश्वास धोंडगे यांनी व्यक्त केला असून ते आगामी काळात काळा गहू लागवड वाढवणार आहेत.
त्यांनी उत्पादित केलेल्या गव्हापैकी दहा किलो गहू घरी खाण्यासाठी ठेवणार आहेत तर उर्वरित गहू बियाणे म्हणून वापरणार असून यातून त्यांना अधिकचे उत्पादन मिळवायचे आहे. शेतीमध्ये जर बदल केला तर चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते हे धोंडगे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होत आहे.