Ahmednagar Farmer Success Story : अहमदनगर जिल्ह्याची सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख आहे. येथील शेतकऱ्यांनीही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आपल वेगळेपण जोपासल आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत विविध नवखे प्रयोग केले आहेत.
या प्रयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची कमाई देखील केली आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी सफरचंद या प्रामुख्याने जम्मू कश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये आढळणाऱ्या पिकाची देखील यशस्वी शेती करून दाखवली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या मौजे वाकडी येथील एका तरुणाने शेती क्षेत्रात यापुढे एक पाऊल टाकले आहे. या तरुणाने चक्क पांढऱ्या रंगाचे जांभूळ उत्पादित करण्याची किमया साधली आहे. पांढऱ्या रंगाच्या जांभळाची यशस्वी लागवड करून यातून लाखो रुपयांचे उत्पन्न या तरुण शेतकऱ्याने कमवून दाखवले आहे.
यामुळे सध्या वाकडी येथील या तरुणाचा हा नवखा प्रयोग राज्यातील शेतकऱ्यांना भुरळ घालत आहे. वाकडी येथील विक्रांत काळे नामक तरुणाने हा पांढरा जांभूळ लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष बाब अशी की विक्रांत काळे हे आयटी क्षेत्रात नोकरीला होते.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कांदा दरात झाली मोठी सुधारणा; ‘या’ बाजारात मिळाला हंगामातील सर्वोच्च दर
मात्र मातीशी जुळलेली नाळ नोकरीमध्ये मन रमू देत नव्हते. परिणामी त्यांनी नोकरीवर तुळशीपत्र ठेवण्याचा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला. नोकरी सोडून शेती करायचे असं त्यांनी ठरवलं. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवलेत.
त्यांनी पांढरे जांभूळ लागवड करण्यापूर्वी सफरचंद लागवडीचा देखील यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. काले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन वर्षांपूर्वी पांढरी जांभळाची बाग फुलवली आहे. 12 बाय 12 फूट अंतरावर जांभळाची रोपे लावली. एकरी 325 रोपे लावलीत.
विशेष म्हणजे तीन वर्ष या जांभळाच्या रोपांमधून उत्पादन मिळणार नव्हते, म्हणून त्यांनी आंतरपीक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विविध पिकांची लागवड या बागेत केली. यातून त्यांना चांगले उत्पादन देखील मिळाले.
आता या जांभळाच्या रोपांना पांढरी जांभळे लागली आहेत. काळे सांगतात की सध्या त्यांच्या पांढऱ्या जांभळांना 250 रुपये प्रति किलो एवढा दर मिळत आहे. एका झाडाला जवळपास सात ते आठ किलो जांभळे लागले आहेत.
यानुसार आता पांढऱ्या जांभळाच्या लागवडीतून या तरुण शेतकऱ्याला एकरी तीन लाख 25 हजार पर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. विशेष म्हणजे झाडे पाच वर्षांची झाल्यानंतर एका झाडापासून 20 ते 25 किलो पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे. अर्थातच त्यांना आगामी दोन वर्षात या जांभूळ बागेतून चांगली कमाई होणार आहे.
काले यांनी सांगितल्याप्रमाणे जांभुळबाग लागवडीसाठी एकरी दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च त्यांना आला आहे. लागवड केल्यानंतर साधारणता पंचवीस वर्षे यापासून उत्पादन मिळणार आहे. लागवडीचा खर्च हा एकदाच असून यानंतर केवळ खत आणि औषधांसाठी खर्च करावा लागणार आहे.
यासाठी साधारणता 30 ते 40 हजार दरवर्षी खर्च येणार आहे. निश्चितच, पहिल्याच वर्षी एकरी सव्वातीन लाखांची कमाई त्यांना झाली असून आगामी दोन वर्षात कमाईचा आकडा हा आणखी वाढणार आहे. यामुळे पांढरे जांभूळ लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचे काळे यांनी नमूद केले आहे. निश्चितच काळे यांचा हा प्रयोग इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी देखील दिशादर्शक ठरणार आहे.