Ahmednagar Farmer Success Story : शेती परवडत नाही अशी तक्रार तुम्ही अनेकदा ऐकली असेल. वेगवेगळ्या नैसर्गिक आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी राजा भराडला जात आहे यात शंकाच नाही. मात्र जगाचे पालन पोषण करणारा बळीराजा संकटामधून नेहमीच मार्ग काढतो. शेतीमध्ये एक ना अनेक आव्हाने शेतकऱ्यांच्या पुढे असतानाही यातून शेतकरी बांधव यशस्वीरित्या मार्ग काढतात.
असेच एक उदाहरण अहमदनगर मधून समोर येत आहे. नगर मधील एका प्रयोगशील शेतकऱ्याला 2014 च्या दुष्काळातून मोठे नुकसान सहन करावे लागले. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असतानाही या शेतकऱ्याने हार मानली नाही आणि आज चंदन लागवडीतून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल करत आहेत. यामुळे सध्या नगरच्या या शेतकऱ्याचे नाव संपूर्ण राज्यभर चर्चेत आले आहे.
राजेंद्र रावसाहेब गाडेकर हे नगर मधील एक प्रयोगशील शेतकरी असून चंदन लागवडीतून ते कोट्यावधींची उलाढाल करत आहेत. गाडेकर यांनी पिंपळनेर येथील 27 एकर माळरानावर डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ या पिकांची लागवड केली आणि या फळ पिकांमध्ये चंदनाची आंतरपीक म्हणून लागवड केली.
या 27 एकर जमिनीत त्यांनी 14000 चंदनाची झाडे लावली आहेत. यासाठी त्यांना केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांचा देखील लाभ मिळाला आहे. आज ते आपल्या शेतातील चंदनातून वेगवेगळे पदार्थ तयार करतात.
चंदन अगरबत्ती, तेल, चंदन पावडर सह इतर गोष्टी तयार करुन विक्री करतात. गाडेकर यांनी 2017-18 मध्ये तामिळनाडू येथून सफेद चंदनाची रोपे मागवली आणि एकाच वर्षात 27 एकरात 14 हजार चंदनाच्या रोपांची लागवड केली.
चंदनाचे पीक हे कमी पाण्यात आणि कमी खर्चात तयार होते यामुळे त्यांनी या पिकाची निवड केली. चंदन शेतीसाठी आणि फळ पिकासाठी पाणी पुरावे यासाठी त्यांनी एक मोठे शेततळे देखील बांधले आहे. सोबतच त्यांच्याकडे दोन विहिरी देखील आहेत.
गाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना तीन वर्षांनी बिया येतात आणि बाजारात या बिया 300 ते 600 रुपये प्रति किलो या दरात विकल्या जातात. मात्र चंदनाचे झाड स्वतः अन्न तयार करत नाहीत म्हणजे ते परपोषी आहे. यामुळे प्रत्येक चंदनाच्या झाडाजवळ एक कडुनिंबाचे झाड लावण्यात आले आहे.
चंदन लागवडीसाठी कमी खर्च येतो तसेच याच्या व्यवस्थापनासाठी ही कमी खर्च येतो. मात्र चंदनाची चोरी होण्याची भीती असते. यामुळे याच्या सुरक्षिततेसाठी गाडेकर यांनी शिकेकाई, सागरगोटा, केकताड आदी काटेरी वनस्पतींचे कुंपण घातले आहे.
गाडेकर यांना आता डाळिंब सारख्या फळ पिकांमधून आणि या फळ पिकांमध्ये लागवड केलेल्या चंदनाच्या झाडांमधून करोडो रुपयांची कमाई होत आहे. यामुळे गाडेकर यांचा हा प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक ठरत आहे. त्यांनी स्वतः 400 शेतकऱ्यांना चंदन लागवडीसाठी मदत सुद्धा केली आहे.