Ahmednagar Farmer News : गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली. दुष्काळामुळे गतवर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट आली. दुसरीकडे बाजारात उत्पादित झालेल्या मालाला सुद्धा अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
यामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी जोर धरत होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने 2023 च्या खरीप हंगामात उत्पादित झालेल्या कापसाला आणि सोयाबीनला अनुदान देण्याची मोठी घोषणा केली.
विशेष म्हणजे आता या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टर च्या मर्यादित मिळणार आहे.
म्हणजे एका शेतकऱ्याला कमाल दहा हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वीस गुंठ्यापेक्षा कमी जमिनीत सोयाबीन किंवा कापसाची लागवड केली असेल त्यांना किमान 1000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यातील कापूस अन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 175 कोटी रुपयांची अनुदान मिळणार आहे. यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 68.12 कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना १०७.१२ कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे.
जिल्ह्यातील पाच लाख 8 हजार 530 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 175 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी गेल्यावर्षी अर्थात 2023 च्या खरीप हंगामात ई पिक पाहणीमध्ये सोयाबीन आणि कापसाची नोंद केली असेल त्यांनाच फक्त या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बँक खात्यासोबत आधार लिंक केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली ही 175 कोटी रुपयांची मदत लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.