Ahmednagar Farmer News : गेल्या काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने भाजीपाल्याच्या बाजारभावात मोठी घट आली आहे. टोमॅटोसह जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे तर मोठे नुकसान होत आहे.
लाखो रुपयांचा खर्च करून टोमॅटो उत्पादकांना पिकातून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहेत. शिवाय, या चालू मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या महिन्यात भर पावसाळ्यात पाऊस नव्हता यामुळे खरीपातील पिकांना याचा मोठा फटका बसला होता.
भाजीपाला आणि फ़ळबाग पिकांना देखील कमी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरी संकटात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विशेषता सात सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे मात्र अजूनही राज्यातील काही भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. अशातच या संकटाच्या काळात डाळिंब उत्पादकांना थोडासा दिलासा मिळत आहे. कारण की डाळिंबाच्या दरात मोठी तेजी आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबाला तब्बल 475 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे शेतकरी विवेक अजिनाथ रायकर यांच्या डाळिंबाला हा विक्रमी भाव मिळाला आहे. विवेक यांनी काल अर्थातच 10 सप्टेंबर रोजी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा या उपबाजार समितीमध्ये आपला डाळिंब विक्रीसाठी नेला होता.
या बाजारात विवेक यांच्या डाळिंबाच्या 20 किलो कॅरेटला तब्बल नऊ हजार 500 रुपये एवढा भाव मिळाला आहे. तसेच विवेक यांच्या आणखी एका डाळिंबाच्या कॅरेटला साडेसात हजार रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला आहे. यामुळे विवेक मोठे समाधानी पाहायला मिळालेत. खरंतर गेल्या काही दिवसांपासून जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा या उपबाजारात डाळिंबाच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे.
8 सप्टेंबरला देखील या बाजार समितीमध्ये डाळिंबाच्या 20 किलोच्या कॅरेटला तब्बल आठ हजार रुपये एवढा विक्रमी भाव मिळाला होता. दरम्यान आता 10 सप्टेंबरला झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये डाळिंबाच्या एका कॅरेटला तब्बल नऊ हजार 500 रुपये एवढा विक्रमी दर मिळाला आहे. यामुळे सध्या पंचक्रोशीतील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या बाजार समितीत फक्त पुणे जिल्ह्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात असे नाही तर पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शिरूर, अहमदनगर या ठिकाणाहून देखील शेतकरी या बाजारात डाळिंब विक्रीसाठी आणत असतात. म्हणजेच ही बाजारपेठ पुणे आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी खूपच महत्त्वाची आहे. वास्तविक ही बाजारपेठ कांद्याच्या लिलावासाठी विशेष ओळखली जाते मात्र गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाला विक्रमी भाव मिळत असल्याने हे मार्केट विशेष चर्चेत आले आहे.
बाजार समिती प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये 1732 डाळिंबाची कॅरेट विक्रीसाठी आली होती. यात वीस किलोच्या एका क्रेटला ९५०० रुपये, एक नंबर डाळिंब कॅरेटला ७५००, दोन नंबर डाळिंब कॅरेटला ६५०० रुपये, तीन नंबर डाळिंब कॅरेटला ५५०० रुपये दर मिळाला तर चार नंबर डाळींब कॅरेटला २००० रुपये भाव मिळाला आहे.