Ahilyanagar News : केंद्र अन देशभरातील विविध राज्य सरकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातही शेतकरी हिताच्या असंख्य योजना सुरू आहेत. खर तर गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाहीये.
जर समजा शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळाले तर उत्पादित झालेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. सरकार कोणाचेही असो मात्र शेतकऱ्यांची ही कोंडी दूर होण्याचे नाव काही घेत नाही.
राज्यात उत्पादित होणाऱ्या सर्वच महत्त्वाच्या पिकांबाबत हीच परिस्थिती पाहायला मिळते. कांदा बाबत बोलायचं झालं तर गेल्या काही वर्षांपासून आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय.
अहिल्यानगर, नाशिक समवेत संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी नेहमीच्या संकटांमुळे भरडला जात असून यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी झाले आहेत. वास्तविक, कांदा हे एक कॅश क्रॉप आहे अर्थातच नगदी पीक आहे.
मात्र अनेकदा कांद्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्येही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादित झालेल्या कांद्याला देखील बाजारात अपेक्षित भाव मिळाला नव्हता.
यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली. गेल्या वर्षी कांदा अगदी 100 ते 200 रुपये प्रति क्विंटल या दरात विकावा लागला होता. चांगल्या मालाला सुद्धा गेल्यावर्षी पाहिजे तसा भाव मिळाला नाही. कांदा अगदीच रद्दीपेक्षा कमी दरात विकावा लागला.
यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदानाची घोषणा करण्यात आली. राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारने कांद्याला अनुदान देण्यासाठी कांदा अनुदान योजना २०२२-२३ राबवली होती. या अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात आले आहे.
अहिल्या नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना देखील या अनुदान योजनेचा लाभ मिळाला आहे. कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 55 हजार 368 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे.
या ५५ हजार ३६८ लाभार्थी शेतकऱ्यांना 115 कोटी 96 लाख 64 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. हे अनुदानाची रक्कम पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच वर्ग करण्यात आली आहे.
यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाचे कौतुक केले जात आहे. जिल्ह्यातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली असल्याने या शेतकरी कुटुंबाला अडचणीच्या काळात मोठी मदत झाली आहे.