Ahilyanagar Breaking : अहिल्या नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातून धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस ट्रेन ला पुणतांबा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणतांबा रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अमरावती पुणे एक्सप्रेस ट्रेन आणि महाराष्ट्र एक्सप्रेस ट्रेन ला पुणतांबा जंक्शन वर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
खरे तर पुणतांबा जंक्शनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला येथील ग्रामस्थांच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. येथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी रेल रोको आंदोलन केले होते.
त्यानंतर रेल्वे मंत्र्यांसोबत यासंदर्भात भेटही घेण्यात आली होती. दरम्यान पुणतांबा व परिसरातील नागरिकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर आता पुणतांबा जंक्शनवर या रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या दोन गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आला आहे.
शुक्रवार अर्थातच 11 ऑक्टोबर 2024 पासून अमरावती-पुणे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन जलद गाड्यांना पुणतांबा येथे थांबा देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने यावेळी दिली आहे.
एवढेच नाही तर दौंड मनमाड मार्गावरून धावणाऱ्या अन्य काही जलद गाड्यांना, तसेच शिर्डीहून मनमाड कडे जाणाऱ्या गाड्यांना देखील पुणतांबा रेल्वे स्थानकावर लवकरच थांबा मंजूर केला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.
नक्कीच हा देखील निर्णय घेण्यात आला तर पुणतांबा ग्रामस्थांना याचा मोठा फायदा होणार आहे. शिर्डी हे पुणतांबा रेल्वे स्थानकावरून अवघ्या पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे. अशा परिस्थितीत जर पूणतांब्याला थांबा मिळाला तर शिर्डी येथे ये-जा करणाऱ्या भाविकांना देखील याचा मोठा फायदा होण्याची आशा आहे.
पुणतांब्याला दक्षिणकाशी म्हणून ओळख मिळालेली आहे. यामुळे येथेही दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. हेच कारण आहे की, पुणतांबा रेल्वे स्थानकाला जंक्शन चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या स्थानकावर फारच कमी गाड्या थांबा घेत आहेत.
मात्र पुणतांबा जंक्शनवर शुक्रवारपासून पुणे अमरावती एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळू लागला आहे. त्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार असून भाविकांना देखील या निर्णयाचा फायदा होणार आहे.