Agriculture Scheme : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध शेतकरी हिताच्या योजना चालवल्या जात आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मदत पुरवली जात आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत.
यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा देखील समावेश होतो. दरम्यान पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत आता मोठी वाढ होणार आहे.
खरंतर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत. दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे एकूण 3 हफ्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांना वितरित केले जात आहेत. आता मात्र या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसान योजनेच्या 6000 रुपयांच्या रकमेत आणखी 50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 9,000 रुपयाचा लाभ दिला जाऊ शकतो. म्हणजेच या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 2,000 ऐवजी 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे.
याबाबत मात्र केंद्र शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण एका मीडिया रिपोर्ट मध्ये केंद्र सरकार आगामी लोकसभा आणि देशातील काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
केव्हा होणार निर्णय ?
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेच्या रकमेत 50% वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर विचाराधीन आहे. दरम्यान, हा प्रस्ताव मान्य झाल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर वीस हजार ते 30 हजार कोटीपर्यंतचा बोजा वाढणार आहे.
मात्र याची अंमलबजावणी केव्हापासून होणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही. पण पुढील वर्षी अर्थातच 2024 मध्ये देशातील एकूण चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीच्या पूर्वीच याबाबतचा निर्णय केंद्र शासनाकडून घेतला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे.