Agriculture Scheme : भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखले जाते. कारण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. देशातील जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा स्थितीत आपल्या देशाला कृषीप्रधान देशाचा दर्जा प्राप्त आहे.
दरम्यान या कृषी प्रधान देशाचा शेतकरी हा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा स्थितीत देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्रातील सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते. काँग्रेस सरकारला हद्द बाहेर करून सत्तेत विराजमान झालेल्या मोदी सरकारने देखील देशातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.
यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी आणि पी एम किसान मानधन योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेचा देखील समावेश होतो. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे.
यामधील पी एम किसान मानधन योजनेचा विचार केला असता या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 36 हजार रुपयांपर्यंतची पेन्शन पुरवली जात आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपयांपर्यंतची पेन्शन मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पीएम किसान मानधन योजनेचे स्वरूप थोडक्यात
ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे. म्हणजेच या योजनेसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात नाही. शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते या योजनेत सहभागी होऊ शकतात. यासाठी मात्र 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरीच फक्त पात्र राहतात.
तसेच या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांना अल्पशी गुंतवणूक देखील करावी लागते. म्हणजेच सुरुवातीला या योजनेत पैसे जमा करावे लागतात आणि नंतर मग शेतकऱ्यांना उतारवयात या योजनेच्या माध्यमातून पेन्शन पुरवली जाते.
किती रक्कम गुंतवावी लागते
हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातो. पी एम किसान मानधन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी किती रक्कम गुंतवावी लागते असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जातो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत पेन्शन मिळवण्यासाठी गुंतवणुकीची रक्कम अर्जदार शेतकऱ्यांच्या वयानुसार ठरत असते.
जर समजा तुम्ही 18 वर्षे वयाचे असाल आणि या योजनेत भाग घेतला असेल तर तुम्हाला फक्त 55 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच जर तुम्ही चाळीस वर्षे वयाचे असाल आणि या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला दर महिन्याला 200 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
पेन्शन केव्हा सुरू होते?
तुम्ही या योजनेत सहभाग घेतला असेल आणि या योजनेत दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत असाल तर तुम्हाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत पेन्शन मिळणार आहे. वय वर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना तीन हजार रुपयांची पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. अर्थातच एका वर्षात या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला 36 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता?
या योजनेसाठी भारतीय शेतकरी पात्र ठरतात.
किमान 18 आणि कमाल चाळीस वर्षे वयोगटातील शेतकरीच फक्त यासाठी पात्र राहतात.
दोन हेक्टर शेतजमीन किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरीच फक्त यासाठी पात्र राहतात.
अर्ज कुठे करणार
तुम्ही या योजनेसाठी सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतात. याव्यतिरिक्त तुम्ही पीएम किसान मानधन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम वेबसाईटवर जावे लागेल आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर आणि या योजनेसाठी अर्ज सादर केल्यानंतर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात?
या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जसे की, सातबारा उतारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागतात.