Agriculture News : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातून येत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर शेतीसाठी पाणी हा घटक खूपच महत्त्वाचा ठरतो. पाण्याविना शेती होऊ शकत नाही.
मात्र अनेक शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसतात. अशावेळी शेतकरी बांधव दुसऱ्या ठिकाणाहुन पाईपलाईन करून पाणी आणत असतात.
मात्र पाईपलाईन करताना पाईपलाईनच्या मार्गातील शेतकरी अनेकदा पाईपलाईनवर हरकत घेतात. शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी होत असते.
अशा परिस्थितीत जर शेजारील शेतकरी पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर काय करावे ? दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन कशी घ्यावी असे काही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन कशी घ्यावी?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर शेजारील शेतकरी त्याच्या शेतजमिनीतून पाईपलाईन टाकण्याची परवानगी देत नसेल तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 49 नुसार तहसीलदार महोदय यांना अर्ज करू शकता.
तहसीलदार महोदय यांना अर्ज प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून तुमची पाईपलाईन जाणार आहे त्या संबंधित सर्व शेतकऱ्यांना नोटीस बजावतात.
नोटीस बजावल्यानंतर सदर शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. तसेच त्यांचे हरकत मुद्दे असतील तर ते हरकत मुद्दे तपासून पाईपलाईन टाकण्याची परवानगी द्यायची की नाही हे ठरवतात आणि याबाबतचे आदेश दिले जातात.
जर समजा तहसीलदार महोदय यांनी पाईपलाईन टाकण्याची परवानगी दिली तर अर्जदार शेतकऱ्याला पाईपलाईन टाकताना काही गोष्टींची काळजी घेण्यास सांगतात. पाईपलाईन टाकताना अर्जदार शेतकऱ्याला काही अटी लावून दिल्या जातात.
यामध्ये पाईपलाईन टाकत असताना शेजारील शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली पाहिजे. पाईपलाईन ही कमीत कमी अंतरातून नेली पाहिजे. पाईपलाईन एक मीटर खोल खोदली गेली पाहिजे.
पाईपलाईन टाकत असताना जर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर अर्जदार शेतकऱ्याने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशा काही अटी यामध्ये असतात.