Agriculture News : जमिनीच्या तसेच मालमत्तेच्या खरेदी प्रक्रियेत तुम्ही अनेकदा साठेखत हा शब्द ऐकला असेल. मालमत्तेची खरेदी-विक्री करताना साठेखत शब्द ऐकायला मिळतो खरा, पण साठेखत म्हणजे नेमके काय, हे कधी केले जाते, याचा नेमका उपयोग काय होतो? हे प्रश्न तुम्हालाही पडले आहेत का? मग आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
साठेखत हा एक करार आहे जो की एखादी मिळकत किंवा मालमत्ता भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देतो. म्हणजेच साठेखत केले म्हणजे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण होत नाही. तर भविष्यातील व्यवहाराचा वचन देणारा हा एक करारनामा असतो.
मात्र असे हस्तांतरण होण्यासाठी साठेखतामध्ये ज्या अटी आणि शर्ती दिलेल्या असतात त्या पूर्ण होणे आवश्यक आहे. जमीन मालकाच्या तसेच खरेदीदाराच्या दोन्हीच्या अटी आणि शर्ती यामध्ये नमूद असतात. मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५४ मध्ये याबाबत तरतूद आहे.
साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार जरूर आहे मात्र यामुळे खरेदीदाराला कोणतेच हक्क मिळत नाही, यामुळे कोणताच बोजा वा हितसंबंध निर्माण होत नाही. यामध्ये नमूद करण्यात आलेल्या अटीचे पालन झाल्यानंतर खरेदीदाराला सदर मिळकत खरेदी करण्याचा अधिकार मिळतो. विकणाऱ्याला देखील संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा अधिकार मिळतो.
जमीन मालकाच्या आणि खरेदीदाराच्या दोन्हींच्या अटींची पूर्तता झाल्यानंतर त्या सदर मिळकतीचे खरेदी खत तयार होते आणि खरेदी खत तयार झाल्यानंतरच खरेदीदाराला त्या संपूर्ण मिळकतीचा ताबा दिला जातो. आता आपण साठेखत का केले जाते याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
साठेखत का होते ?
साठेखत करण्याची अनेक कारणे आहेत. अनेकदा मिळकतीचे हस्तांतरण लगेच करणे शक्य नसते, मात्र मिळकत विक्री करणाऱ्याला आणि खरेदी करणाऱ्याला याला कायदेशीर स्वरूप द्यायचे असते मग अशावेळी साठेखत केले जाते.
किंवा, जमिनीवर सरकारचे आरक्षण असेल किंवा जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप आणि चतुःसीमा माहीत नसेल अथवा जमिनीवर इतरांचा ताबा किंवा अतिक्रमण असेल, अशा अडचणी असल्यास जमिनीचे लगेचच खरेदीखत करून हस्तांतरण होणे शक्य नसते, मग अशा प्रकरणात देखील साठेखत हा पर्याय बेस्ट असतो.
किंवा एखाद्या मिळकतीची किंमत ही फारच अधिक असते, आता मिळकत महाग असल्यामुळे खरेदीदाराला पैशांची ऍडजेस्टमेंट करण्यास थोडा वेळ लागतो, अशा परिस्थितीत खरेदीदार आणि विक्री करणारे दोन्हीही कायदेशीर सुरक्षा मिळावी यासाठी साठेखत करतात.
किंवा काही खरेदीदार मालमत्ता खरेदी करण्यासाठी कर्ज काढतात, मात्र कर्ज काढण्यासाठी त्याच्या नावावर मालमत्ता असणे आवश्यक आहे किंवा त्याबाबतचा करार असणे आवश्यक आहे आता अशा प्रकरणांमध्ये देखील खरेदीदार साठेखत करतात. याशिवाय इतरही काही कारणे आहेत.