Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश. मात्र या शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. शिवाय या संकटातून कसंबस वाचलेलं पीक देखील बाजारात कवडीमोल दरात विकल जात.
परिणामी शेतकरी आर्थिक टंचाईत सापडतो. यामुळे अनेक शेतकरी विवचनेतून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत असतात. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब वाऱ्यावर सुटते, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येतो. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत दिली जाते.
मात्र, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी पेन्शनची स्पेशल अशी योजना महाराष्ट्रात कार्यान्वित नसल्याचे चित्र आहे. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवांना इतर सामान्य विधवा स्त्रियांप्रमाणे पेन्शन देण्यात येते. म्हणजे अशा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना स्पेशल अन्य कोणतीही योजना सुरू नसून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातूनचं या शेतकऱ्यांच्या विधवांना पेन्शन देण्याचे प्रावधान आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, संजय गांधी निराधार योजना ही निराधारांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून निराधारांना आर्थिकदृष्ट्या आधार देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे.
दरम्यान या योजनेसाठी दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या किंवा कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये असलेल्या किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अंपगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, पक्षाघात प्रमस्तिष्कघात, एडस, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकलसेलग्रस्त महिला पात्र ठरतात.
या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना, तसेच इतर पात्र व्यक्तींना संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत दरमहा अर्थसहाय देण्यात येते. असं या योजनेचे स्वरूप शासनाकडून आखण्यात आल आहे. यामध्ये लाभार्थ्याला जर एक अपत्य असेल तर 1100 रुपये प्रति महिना आणि दोन अपत्य असतील तर एक हजार दोनशे रुपये प्रति महिना देण्याचे प्रावधान आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका लेखी उत्तरात दिली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना देखील संजय गांधी निराधार योजना अंतर्गतच लाभ दिला जात असल्याचे शिंदे यांच्याकडून नमूद करण्यात आले आहे.