Agriculture News : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या राज्यात सुगीचे दिवस सुरू आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद सारख्या सर्वच पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. म्हणजे येत्या काही दिवसांनी आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. या चालू महिन्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या अनेक पिकांची पेरणी सुरू होईल.
अशा परिस्थितीत आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी हरभरा, करडई, ज्वारी या रब्बी पिकांचे वाण विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.
यासोबतच विद्यापीठाच्या माध्यमातून भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची विक्री देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. विद्यापीठाचे बियाणे हे दर्जेदार तर असतातच शिवाय शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक होत नाही. याचे रेट सुद्धा शेतकऱ्यांसाठी चांगलेच असतात.
अशा परिस्थितीत, आज आपण राहुरी विद्यापीठाने नेमक्या कोणकोणत्या पिकांच्या बियाण्यांची विक्री सुरू केली आहे आणि याच्या किमती कशा आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा आजचा हा आमचा प्रयत्न.
विद्यापीठाने कोणत्या बियाण्यांची विक्री सुरू केली
राहुरी विद्यापीठाने हरभऱ्याचे फुले विक्रांत, फुले विशाल, फुले विश्वराज, फुले विक्रम या जातींच्या बियाण्यांची विक्री सुरू केली आहे. हरभऱ्याच्या या सर्व जातींच्या बियाण्यांची 30 किलो बॅगची किंमत ही 2400 रुपये आहे.
यासोबतच करडई या पिकाच्या फुले भिवरा या जातीच्या बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. याच्या चार किलो बियाण्याच्या बॅगची किंमत चारशे रुपये एवढी आहे.
शिवाय कृषी विद्यापीठाने ज्वारीच्या फुले वसुधा, फुले सुचित्रा आणि फुले यशोमती या जातीच्या बियाण्यांची विक्री सुरू केली आहे. या जातीच्या बियाण्यांची चार किलो बॅग ची किंमत ही 240 रुपये एवढी आहे.
यासोबतच गवार, वांगी, मिरची, कारले, घोसाळे या भाजीपाला पिकांच्या बियाण्यांची विक्री देखील विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. नक्कीच यामुळे राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.