Agriculture News : शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीचे अनेक उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेत. यामध्ये काही मंत्र्यांचा देखील समावेश होता. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला ही बाब सरकारने देखील मान्य केले.
यामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी मोठमोठे निर्णय घेत आहे. शेतकऱ्यांना खुश करण्याचा आणि त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू झाले आहेत.
पण, शेतकरी सरकार विरोधात प्रचंड नाराज असून आता थेट कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे. कर्जबाजारीपणामुळे राज्यातील शेतकरी हतबल झाला असून शासनाच्या धोरणांमुळेच सरकारला मोठा फटका बसला आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी जोर धरत आहे.
विशेष म्हणजे काही मंत्र्यांनी देखील सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली आहे. यामुळे निवडणुकीच्या आधी कर्जमाफी संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
जानेवारी ते मे 2024 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान मिळणार आहे. यासाठी 596 कोटी 21 लाख 55 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याच्या वितरणासाठी राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.
यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जानेवारी ते मे या कालावधीत अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 3 लाख 54 हजार 765 शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे.
विशेष म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. जिरायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ६००, बागायत पिकांसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर अशी मदत मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दोन दिवसांपूर्वी अर्थातच दोन ऑगस्टला काढण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
नाशिक विभाग : अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार
पुणे विभाग : सोलापूर, पुणे
अमरावती विभाग : अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम
नागपूर विभाग : गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, नागपूर