Agriculture News : शेतकरी बांधवांच्या हितासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून या शेतकरी हिताच्या योजना चालवल्या जातात.
राज्य शासनाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थातच पोखरा ही योजना देखील चालवली जाते. या योजनेअंतर्गत मराठवाडा विदर्भ तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
यामध्ये कृषी यांत्रिकीकरणापासून ते फळबाग लागवडीपर्यंतच्या नानाविध बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत बांबू शेतीसाठी देखील अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. खरं पाहता अलीकडे हवामान बदलाचा शेतीवर मोठा विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी जाणकार लोकांकडून सल्ला दिला जात आहे.
बांबूचा वापर जैवइंधन तयार करण्यासाठी अलीकडे मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याचा वापर कागद तयार करण्यासाठी देखील केला जातो. याव्यतिरिक्त बांबू लागवडीचा अजून एक फायदा म्हणजे जमिनीची धूप यामुळे रोखता येणार आहे. याव्यतिरिक्त कार्बन उत्सर्जनामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, जमिनीचा कस वाढवण्यासाठी बांबू शेती एक फायदेशीर पर्याय ठरत असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
बांबूचे एवढे फायदे लक्षात घेऊन याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना चालना दिली जात आहे. शेतकरी बांधव बांबूची लागवड मुख्य शेतात किंवा बांधावर करू शकतात. यासाठी शासनाकडून अनुदानाचे देखील प्रावधान करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने बांबू शेतीला चालना देण्यासाठी पोखरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले आहे.
बांबूच्या पिकावर प्रतिरोप अस अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बांबू शेतीसाठी शेतकरी बांधवांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत प्रतिरोप 120 रुपये अनुदान मिळणार आहे. निश्चितच यामुळे महाराष्ट्रात बांबू शेतीला चालना मिळणार असून शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुपटीने वाढण्यास मदत होणार आहे.