Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यातील जवळपास 25 ते 26 जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादन घेतले जाते. म्हणजेच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
राज्यातील शेतकरी खरीप, लेट खरीप आणि रब्बी हंगामामध्ये कांदा उत्पादित करतात. मात्र, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. अनेकदा कांद्याला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही.
अशा परिस्थितीत, शेतकरी बांधव काही कांद्याची साठवणूक करतात. खरीप हंगामामध्ये उत्पादित होणारा लाल कांदा साठवता येत नाही. मात्र रब्बी हंगामातील कांद्याची साठवणूक केली जाऊ शकते.
मात्र रब्बी हंगामातील साठवणुकीतील कांदा देखील मोठ्या प्रमाणात खराब होतो. एका आकडेवारीनुसार, रब्बी हंगामातील 11,000 कोटी रुपयांचा कांदा दरवर्षी खराब होतो.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. दरम्यान शेतकऱ्यांचे हेच नुकसान कमी करण्यासाठी आता शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता कांदा साठवणुकीसाठी AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदा खराब होण्याची आणि सडण्याची आकडेवारी देखील मिळू शकणार आहे.
या तंत्रज्ञानामुळे साठवलेला कोणता कांदा खराब होतोय आणि कोणता कांदा चांगला आहे हे ओळखता येणार आहे. परिणामी खराब होत असलेला कांदा चांगल्या कांद्यातून बाजूला ठेवता येईल आणि यामुळे अधिकचे होणारे नुकसान टाळता येईल अशी आशा आहे.
त्यासाठी सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार असून या अंतर्गत सुरुवातीला देशभरात 100 आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आधारित कांदा साठवणूक केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
यानंतर मग ही संख्या 500 पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार राहणार आहे. मात्र यासाठी किती निधी शासनाकडून उपलब्ध होईल याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.
परंतु हा पायलट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे होणारे करोडो रुपयांचे नुकसान यामुळे वाचणार आहे.