Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या अडचणींचा आणि नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटांमुळे आता शेतीचा व्यवसाय खूपच आव्हानात्मक बनला आहे.
अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा नानाविध संकटांमुळे शेतकरी राजा भरडला जात आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये देखील राज्यातील शेतकऱ्यांवर असेच संकट पाहायला मिळाले होते. नोव्हेंबर महिन्यात नाशिक विभागात गारपीटीची नोंद करण्यात आली होती.
गारपिटीमुळे या विभागातील शेतकऱ्यांचे अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. परिणामी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात होती. नाशिक विभागात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तेथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
त्यावेळी विभागातील एक लाख ८३१६ शेतकऱ्यांचे 56 हजार 683 हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले. यामुळे या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली होती.
या नुकसानीसाठी सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने 91 कोटी 65 लाख 4 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र शासनाने नंतर निकषा बाहेर जाऊन मदत करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे नंतर जिल्हा प्रशासनाने 144 कोटी दहा लाख 66 हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे राज्य शासनाने या सुधारित निधीला मान्यता दिलेली आहे. या निधी वितरणास राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असून हा निधी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना येत्या एका महिन्यात मिळणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्याला किती निधी
नाशिक – ९९७८.६० लाख, धुळे 79.19 लाख, नंदुरबार 495.43 लाख, जळगाव १०२०.०९ लाख, अहमदनगर 2837.35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात हा निधी आता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यामुळे संबंधित विभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.