Agriculture Loan : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. यामुळे शेती क्षेत्राला उभारी मिळावी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. शासन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे.
बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
मात्र या साऱ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी देखील आजही भारतासारख्या कृषी प्रधान देशात शेतकऱ्याला जर कर्जाची गरज भासली तर त्याला बँकेत जाऊन अर्ज केल्यानंतर चार ते पाच आठवड्यांच्या कालावधीनंतर कर्ज वितरित केले जात असते.
यामुळे शेतकऱ्यांना आपातकालीन परिस्थितीमध्ये पैशांची आवश्यकता भासली, शेतीसाठी पैशांची गरज भासली तर त्याला सावकाराच्या दारातच जावे लागते. मात्र आता शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे.
कारण की शेतकऱ्यांना आता फक्त पाच मिनिटात कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी नाबार्ड आणि आरबीआयने नुकताच एक महत्त्वाचा करार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे NABARD ने भारतीय रिझर्व्ह बँकेची शाखा RBIH सोबत पार्टनरशिप केली आहे. शेतकऱ्यांना जलद गतीने कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी ही भागीदारी झाली असल्याचे बोलले जात आहे.
रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हब म्हणजे RBIH ही रिझर्व बँक ऑफ इंडिया ची मालकी असणारी कंपनी आहे. या कंपनीच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) सह ई-KCC कर्ज प्लॅटफॉर्म जोडणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी जास्त त्रास होऊ नये, त्यांना जलद गतीने कर्ज मिळावे यासाठी आता नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (RRBs) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कर्ज प्रणाली प्लॅटफॉर्म तयार केले आहे.
यामुळे बँकेचे कार्यक्षमता सुधारणार आहे आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज मिळू शकणार आहे. याचा देशभरातील 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
निश्चितच जसे बोलले जात आहे तसे खरे ठरले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांना शेतीत अजून चांगली कामगिरी करता येणार आहे.