Agriculture Loan : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहुन अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. त्यामुळे आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सुद्धा शेतीवर अवलंबून आहे. परिणामी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.
यामध्ये किसान क्रेडिट कार्ड या लोकप्रिय योजनेचा देखील समावेश होतो. खरंतर, शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी पैशांची गरज असते.
बी-बियाणे, खते, कृषी निविष्ठांची वाहतूक, मशागत, मजुरी इत्यादींवर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. तेव्हा कुठे मग शेतकऱ्यांना शेती मधून उत्पन्न मिळत असते.
मात्र, नैसर्गिक संकटांमुळे अलीकडे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेकदा भांडवल अभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
दरम्यान, शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारने केसीसी अर्थातच किसान क्रेडिट कार्ड नामक एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे.
याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत चेक कर्ज खूपच कमी व्याजदरात पुरवले जात आहे. यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कसे आहे या योजनेचे स्वरूप ?
किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. हे कर्ज शेतकऱ्यांना सात टक्के व्याज दरात उपलब्ध होते. विशेष म्हणजे यावर दोन टक्के एवढी व्याज सवलत दिली जाते.
म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकऱ्यांना व्याजावर दोन टक्के सवलत मिळते. जर शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी एक टक्का व्याज सवलत मिळते.
अशा तऱ्हेने या योजनेअंतर्गत मिळणारे तीन लाख रुपयाचे कर्ज शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त चार टक्के व्याजदरात मिळते.
कसं काढणार किसान क्रेडिट कार्ड?
मिळालेल्या माहितीनुसार, किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँकेत अर्ज करावा लागणार आहे. बँकेकडून मिळालेला केसीसीचा अर्ज, पासपोर्ट आकाराचा फोटो, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमिनीचा ७/१२ , ८ अ इत्यादी महत्त्वाचे कागदपत्रे बँकेत जमा करून तुम्ही किसान क्रेडिट कार्ड सहजतेने मिळवू शकता.