Agriculture Land Purchase Loan Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशाला शेतीप्रधान देश म्हणून ओळख प्राप्त आहे. कारण म्हणजे देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीशी निगडित आहे. विशेष म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला पाचवा देश आहे.
आगामी काळात भारताचे अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास अर्थतज्ञांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे.
हेच कारण आहे की, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. देशातील बँका देखील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहेत.
बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक असून या बँकेकडूनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी देखील कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
जमीन खरेदी कर्ज योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया मार्फत शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमीन तसेच पडीक आणि निकामी जमीन खरेदी, विकास आणि लागवड करण्यासाठी वित्तपुरवठा केला जात आहे. दरम्यान आता आपण या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक ऑफ इंडिया जमीन खरेदी कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये
या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीसाठी अधिक मुदत दिली जाते. म्हणजेच हे एक दीर्घ कालावधीसाठी दिले जाणारे कर्ज आहे. हे कर्ज शेतकऱ्यांना परवडेल अशा व्याजदरात उपलब्ध होते. या कर्जासाठी आकर्षक व्याजदर लागू केले जातात. या कर्जासाठी जामीन म्हणून बँकेच्या वित्तपुरवठ्यामधून खरेदी केलेली जमीन बँकेच्या नावे गहाण ठेवली जाते.
किती कर्ज मिळते
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती कर्ज मिळते? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँक ऑफ इंडियाच्या जमीन खरेदी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम ही खरेदी करावयाच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि त्याचे मुल्यांकन आणि विकास खर्च यावर आधारित राहणार आहे. याकरीता संबंधित क्षेत्राच्या निबंधक / उपनिबंधकांकडे मागील 05 वर्षांचे उपलब्ध सरासरी नोंदणी मूल्य आणि बँकेने घेतलेले दृष्टिकोन विचारात घेतले जातात.
कोणाला मिळते कर्ज ?
जमीन खरेदी कर्ज योजनेअंतर्गत कमाल 5 एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आणि कमाल अडीच एकर बागायती जमीन असलेल्या शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी कर्ज मिळते.
भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांना देखील या योजनेअंतर्गत जमिनी खरेदीसाठी कर्ज मिळू शकते. मात्र संबंधित गावातील किंवा त्या गावाजवळील तीन ते पाच किलोमीटर परीघ क्षेत्रातील जमिनी खरेदी करण्यासाठीच कर्ज मिळणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
बँक ऑफ इंडियाच्या जमीन खरेदी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. यासाठी अर्जदाराला केवायसी कागदपत्रे ( यांमध्ये ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा ), उत्पनाशी संबंधित कागतपत्रे, वैधानिक परवानग्या, प्रकल्प प्रस्तावाचा संपुर्ण तपशिल, जमिनीशी संबंधित कागतपत्रे इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. कागदपत्रांबाबत तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.