Agri Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर शेती व्यवसायात गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट तर कधी दुष्काळ यांसारख्या असंख्य संकटांमुळे शेतीमधून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळवता येत नसल्याचे चित्र आहे. खरंतर शेती म्हटलं म्हणजेच पाणी लागतेच.
मात्र आपल्या राज्यात बहुतांशी शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध नाहीये. शिवाय काही भागात पावसाळ्यातही चांगला पाऊस होत नाही. अशा परिस्थितीत तेथे पीक वाचवणे मोठे आव्हानात्मक काम आहे.
अशी परिस्थिती मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही अवर्षणग्रस्त जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. अशा कमी पाणी असलेल्या भागांमध्ये मात्र ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन महत्त्वाची भूमिका निभावत असते.
मात्र प्रत्येक शेतकऱ्याला ठिबक आणि तुषार सिंचन करता येत नाही. कारण की यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते. हेच कारण आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान पुरवले जात आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचन बसवले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी अजूनही या योजनेचा लाभ घेतलेला नाही ही वास्तविकता आहे.
अशा परिस्थितीत जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर या योजनेसाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाने या योजनेसाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमांतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 45% अनुदान दिले जात आहे.
एवढेच नाही तर राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 35 टक्के व 45 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे. अर्थातच या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 90 ते 95% पर्यंतचे अनुदान उपलब्ध होत आहे. पण या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करायचे आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, आधार बँक खात्यासोबत लिंक असणे बंधनकारक, लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे याबाबत स्वयं-घोषणापत्र अर्जासोबत जोडावे लागणार आहे. तसेच यासाठी महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.