Maharashtra Monsoon News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ही अपडेट आहे पावसा संदर्भात. खरंतर मान्सूनचा तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. जून ते सप्टेंबर या मान्सून काळापैकी जून ते ऑगस्ट हा काळ संपला असून आता फक्त एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे.
वास्तविक यावर्षी अगदी सुरुवातीपासून मान्सूनचा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. सुरुवातीला जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम संकटात येणार असे सांगितले जात होते. मात्र जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला म्हणून आता खरीप हंगामातुन चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
परंतु जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल 26 दिवसांपेक्षा अधिक काळ दांडी मारली. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला. अगदी उन्हाळ्यासारखी परिस्थिती पाहायला मिळाली. अजूनही राज्यातील अनेक भागात तशीच परिस्थिती कायम आहे. काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सऱ्या पडत आहेत.
मात्र जोरदार पाऊस जवळपास एका महिन्यापासून राज्यात कुठेच पडलेला नाही. यामुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार अशी शक्यता व्यक्त केली आहे. कृष्णानंदजी यांनी राज्यात 4 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात 4 सप्टेंबर नंतर हळूहळू पावसाचा जोर वाढेल असे त्यांनी नमूद केले आहे. हवामान विभागाने देखील सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर काही तज्ञांनी सप्टेंबर महिन्यात जरी सरासरी एवढा पाऊस पडणार असला तरी देखील यामुळे गेल्या दोन महिन्यातील म्हणजेच जून महिन्यातील आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार नाही असे सांगितले आहे.
पण डॉक्टर होसाळीकर यांनी सप्टेंबर महिन्यात पावसाबाबत पॉझिटिव्ह चित्र तयार होत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यावर्ती पासून अर्थातच तीन ते चार तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तीन ते चार तारखेपासून मध्य भारतात त्यांनी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
यामध्ये महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार असा त्यांचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात तीन ते चार सप्टेंबर पासून ते 20 ते 21 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत महाराष्ट्रातील मराठवाडा या विभागात अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मराठवाड्यातील जनतेला चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बंगालच्या उपसागरात एका मागोमाग एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय हिंदी महासागरातील इंडियन ओशियन डायपोल हा घटक देखील आता सक्रिय झाला असून याचा देखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार असून यामुळे पाऊस पडण्यास पोषक परिस्थिती तयार होणार असा आशावाद यावेळी होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.