Panjabrao Dakh News : मान्सून 2023 चा तीन महिन्यांचा काळ उलटला आहे. आता फक्त मान्सूनचा एक महिना शिल्लक राहिला आहे. त्यानंतर मान्सून माघारी फिरणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास महाराष्ट्रातून ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे.
खरंतर, यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच मान्सूनचा लहरीपणा पाहायला मिळाला आहे. मान्सूनच्या सुरुवातीलाच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला म्हणून जून महिन्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या नाहीत. दरवर्षी जूनच्या अखेरपर्यंत पेरण्या होत होत्या मात्र यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्यात.
काही शेतकऱ्यांच्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या झाल्यात. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला म्हणून शेतकरी संकटात सापडले होते पण जुलैमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरण्या आटोपल्या.
मात्र आता या ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठा खंड पाडला आहे. जून महिन्यातील पावसाची तुट जुलै महिन्यातून भरून निघाली यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र आता ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महिनाभर पावसाचा खंड पडला असल्याने शेती पिके पुन्हा एकदा संकटात सापडली आहेत.
जर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे देखील संकट उभे राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित संपूर्ण महाराष्ट्रातील जनता निदान सप्टेंबर महिन्यात तरी जोरदार पाऊस पडेल आणि पाणी संकट दूर होईल अशी आशा ठेऊन आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने इंडियन ओशियन डायपोल अर्थातच आयओडी आता सक्रिय होणार असल्याने सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार असे सांगितले आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्यात परतणारा पाऊस देखील चांगला बरसणार असेही नमूद केले आहे.
राज्यात 8 सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढणार असे IMD ने स्पष्ट केले आहे. अशातच पंजाबराव डख यांनीही राज्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज बांधला आहे. 5 सप्टेंबर नंतर राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असे त्यांनी नमूद केले आहे.
एकंदरीत भारतीय हवामान विभाग आणि पंजाबराव डख यांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता पंजाब रावांचा आणि हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.