Havaman Andaj : ऑगस्ट महिना येत्या तीन दिवसात संपणार आहे. या चालू महिन्यात काही ठराविक दिवस आणि ठराविक भाग वगळता महाराष्ट्रात पाऊसच पडला नाही. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यामुळे जुलै महिन्यात ज्या पावसाने तारले होते त्याच पावसामुळे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.
खरंतर गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात चांगला पाऊस बरसला म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पिकांना वरखते दिलीत. पेरणी वेळी दिलेल्या खतांमुळे आणि वरखतांमुळे पिकांची जलद गतीने आणि लवकरात लवकर वाढ होईल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती.
शिवाय गेल्या महिन्यात काही भागात ढगाळ हवामान असल्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याने महागड्या फवारण्या देखील केल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने महागड्या औषधांचा आणि खतांचा खर्च वाया जाण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पिकांनी माना टेकल्या आहेत.
अनेक भागातील पिके करपून गेली आहेत. जर येत्या काही दिवसात पाऊस झाला नाही तर पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च तसेच औषधांचा आणि खतांचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. तर काही भागात ऑलरेडी पिके हाताबाहेर गेली आहेत. काही ठिकाणी पिकांची राख रांगोळी झाली आहे. ज्या भागात पाऊस नाही तिथे दुष्काळासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
अजूनही राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा तयार झालेला नाही. विहिरींना पाणी उतरलेले नाही, अनेक भागातील विहिरींनी पावसाळ्यात तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना वण-वण भटकावे लागणार आहे.
यामुळे आता बाकी राहिलेल्या मान्सूनच्या दीड महिन्याच्या काळात तरी चांगला पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. अशातच पुढील पाच दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
साबळे यांनी वर्तवलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संबंधित भागात 31 ऑगस्ट पर्यंत ०.५ ते १.५ मीमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, कोकण विभागातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच मराठवाडा विभागातील धाराशिव, हिंगोली, बीड, संभाजी नगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस पडणार असा अंदाज डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी नुकताच वर्तवला आहे. एकंदरीत, राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही असे यावरून स्पष्ट होत आहे.