Maharashtra Rain : यंदा जून महिन्यात खूपच कमी पाऊस पडला. यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाचा जोर चांगलाच वाढला. राज्यातील कोकण, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात तर अतिवृष्टी देखील झाली होती. अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
विशेषता राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात पूरस्थितीचा मोठा फटका बसला होता. पण आता राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. परिणामी शहरातील सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने येत्या काही तासात पुन्हा एकदा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
येत्या एक ते दोन दिवसात राज्यातील विविध भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. यामध्ये उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईसह उपनगरात मध्यम पावसाचा अंदाज आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या एक ते दोन दिवसात दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
तसेच विदर्भातील अकोला, बुलढाणा, अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये देखील वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असा अंदाज IMD ने नुकताच वर्तवला आहे.
विदर्भ मराठवाडा आणि कोकण सोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. पण पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे.
उत्तर भारतात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असल्याने याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात आगामी काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळेल आणि रब्बी हंगामासाठी देखील या पावसाचा फायदा होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.