Havaman Andaj : महाराष्ट्रात जुलै महिन्यात बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. काही भागात एवढा पाऊस झाला की, पुरस्थिती निर्माण झाली. मात्र काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जून प्रमाणेच कमी होते. तरीही राज्यातील बहुतांशी भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली आहे.
मात्र असे असले तरी गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात तर सलग दहा दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र महाराष्ट्रात जरी ही परिस्थिती पाहायला मिळत असली तरी देखील देशातील काही राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे.
जम्मू-काश्मीर पासून ते ईशान्य कडील राज्यांमध्ये पावसाचा त्राहीमाम पाहायला मिळत आहे. जास्तीच्या पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके पावसामुळे खराब होण्याचा धोका आहे.
साहजिकच या राज्यात जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काल हिमाचल मधील कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. दरम्यान आज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून 18 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या भागात पडणार जोरदार पाऊस ?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, ६ ते ९ ऑगस्ट दरम्यान देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. या कालावधीत देशातील १८ पेक्षा राज्यांमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार आहे.
आज पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत देशातील हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे संबंधित भागातील नागरिकांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. या भागातील शेतकऱ्यांना देखील अधिक सावध राहून शेतीची कामे करावी लागणार आहेत.
महाराष्ट्रात कस राहणार हवामान?
राज्यात कोकण विभागात 10 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज कोकणातील ठाणे आणि पालघर या उत्तर भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील आठ ऑगस्टपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त विदर्भात उद्यापर्यंत मध्यम पावसाची शक्यता असून मराठवाड्यात आज आणि उद्या हलका पाऊस पडणार असा अंदाज आहे.