Shet Rasta : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र आपल्या शेतीप्रधान देशात शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता नसणे याचा देखील समावेश आहे.
देशातील तसेच आपल्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी ही एक प्रमुख अडचण आहे. शेतकऱ्यांना शेतीत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेत रस्ता नसल्यामुळे अगदी पिकाच्या पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत सर्वच बाबींसाठी शेतकरी बांधवांना तारेवरची कसरत करावी लागते.
मित्रांनो खरे पाहता, भारतात जस-जशी लोकसंख्या वाढत आहे तस-तशी शेत जमिनीची विभागणी देखील होत आहे. शेत जमिनीची विभागणी झपाट्याने होत असल्याने शेतजमिनीसाठी आवश्यक शेत रस्त्याची मागणी देखील वाढत आहे.
शेती यशस्वीरीत्या कसण्यासाठी शेतीसाठी शेत रस्ता अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेतजमिनीसाठी रस्ता नसेल तर महाराष्ट्रातील कायद्यात काय तरतुदी आहेत. तसेच शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता मिळण्यासाठी काय करावे लागते, कोणाला अर्ज करावा लागतो, कसा अर्ज करावा लागतो, याविषयी बहुमूल्य माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शेतजमिनीसाठी रस्ता हवा असल्यास अर्ज कसा आणि कुणाला करावा
शेतकरी बांधवांना शेतीसाठी रस्ता आवश्यक असतो. मात्र जर शेतकरी बांधवांना आपल्या शेतासाठी रस्ता उपलब्ध नसेल तर शेतकरी बांधवांना प्रशासनाकडून रस्ता उपलब्ध करून दिला जातो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 143 मध्ये शेतकरी बांधवांना शेतजमिनी साठी आवश्यक रस्ता उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
या कलमात नमूद केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना शेतजमिनी साठी रस्ता नसतो त्यांना शेजारी शेतकऱ्यांच्या बांधावरून शेत रस्ता मंजूर करून दिला जातो. शेतजमिनी साठी रस्ता मिळणे हेतु शेतकरी बांधवांना शेत रस्त्यासाठी तहसीलदारांना अर्ज करावा लागतो.
शेत रस्त्यासाठी तहसीलदार महोदयांना अर्ज कसा लिहायचा
प्रति,
मा तहसिलदार साहेब,
तुमच्या तालुक्याचं नाव
अर्ज – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.
विषय – शेतात ये-जा करण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.
अर्जदाराच्या जमिनीचा तपशील
अर्जदार शेतकऱ्याचे नाव, गाव, तालुका, जिल्हा
गट क्रमांक किती क्षेत्र आहे याची माहिती, आकारणी म्हणजे कराची रक्कम याची माहिती
अर्जदार शेतकऱ्यांच्या लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन आहे त्यांची नावं आणि पत्ता या ठिकाणी लिहावीत.
यानंतर शेतकरी बांधवांना अर्जाचा मायना लिहावा लागणार आहे
मी (शेतकऱ्याचे नाव). (गावाचे नाव) येथील कायमचा रहिवासी आहे. (गावाचे नाव) येथील गट क्रमांक — मध्ये माझ्या मालकीची — हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये ये-जा करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे मला शेतात बैलगाडी तसेच ट्रॅक्टरमधून शेतीसाठी आवश्यक शेतीची साहित्य, बी-बियाणं, रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसेच शेतातील शेतीमाल घरी आणण्यासाठी आणि शेत जमिनीची मशागत करण्यासाठी तसेच मजुरांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तरी मौजे (गावाचे नाव), (तालुक्याचे नाव) येथील गट क्रमांक — मधील (ज्या दिशेला रस्ता हवा आहे ती दिशा) हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.
आपला विश्वासू,
अर्जदार शेतकऱ्याचे नाव
टीप :- शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की, कंसात दिलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपली वैयक्तिक माहिती भरायची आहे. अर्ज करतांना कंस लावायचा नाही.
आवश्यक कागदपत्रे
सदर अर्ज भरून झाल्यानंतर शेतकरी बांधवांना खालील प्रमाणे कागदपत्रे देखील द्यावे लागतात.
अर्जदार शेतकरी बांधवाच्या जमिनीचा कच्चा नकाशा तसेच ज्या शेजारी शेतकरी बांधवांच्या शेत जमिनीच्या बांधावरून रस्त्यासाठी मागणी करण्यात आली आहे त्या शेतजमिनीचा कच्चा नकाशा.
अर्जदार शेतकरी बांधवांचा सातबारा (चालू वर्षाचा तीन महिन्याच्या आतील)
अर्जदार शेतकरी बांधवाच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांचा तपशील जसे की, त्यांची नावे पत्ते आणि जमिनी विषयक माहिती
अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीचा जर कोर्टात खटला सुरु असेल तर त्याचीदेखील माहिती शेतकऱ्यांना द्यावी लागेल. शिवाय खटल्याबाबत आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील.
मित्रांनो अर्जदार शेतकरी बांधवांना अर्ज काळजीपूर्वक भरून वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून तहसीलदार महोदय यांच्याकडे अर्ज जमा करावा लागतो. अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदार शेतकरी तसेच अर्जदार शेतकऱ्याने ज्या शेतकरी बांधवाच्या बांधावरून शेत रस्त्याची मागणी केली आहे त्यांना नोटीस दिली जाते. तसेच या दोघा संबंधित शेतकरी बांधवांना आपआपली मते मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
तहसीलदार महोदय अर्जदार शेतकरी बांधवाला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्ता नाही का तसेच अर्जदार शेतकऱ्याला रस्त्याची खरच गरज आहे का यांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात.
तहसीलदार महोदयांची प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर तहसीलदार महोदय योग्य तो निर्णय घेतात तसेच आदेश जारी करतात.
तहसीलदार महोदय अर्ज स्वीकृत करतात किंवा अर्ज फेटाळून लावत असतात. समजा तहसीलदार महोदयांनी अर्ज स्वीकारला तर लगतच्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदार महोदय यांच्या कडून आदेश पारित केला जातो. हा आदेश देताना ज्या शेतकरी बांधवाच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचे कमीतकमी नुकसान कसे होईल याची खातरजमा केली जाते.
जाणकार लोकांच्या मते, शेत रस्ता हा आठ फूट रुंदीचा मंजूर करून दिला जातो. म्हणजेच एक बैलगाडी जाऊ शकेल एवढा रस्ता अर्जदार शेतकऱ्याला उपलब्ध होतो.
मात्र जर तहसीलदार महोदयांनी काढलेला आदेश ज्या शेतकरी बांधवाच्या बांधावरून रस्ता जाणार आहे त्याला मान्य नसल्यास तो शेतकरी आदेश जारी केल्याच्या दोन महिन्याच्या आत उपविभागीय अधिकार्याकडे अपील करू शकतो किंवा संबंधित शेतकऱ्याला तहसीलदार महोदय यांचा आदेश पारित झाल्यानंतर एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा देखील करता येतो.