Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. खरं तर सप्टेंबर च्या सुरुवातीला राज्यात पाऊस सक्रिय होता. एक ते तीन सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस झाला. अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र चार तारखेपासून पुढील दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली.
पुन्हा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यात पाऊस सक्रिय झाला. 7 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र तदनंतर पावसाचा जोर पुन्हा कमी झाला. अशातच आता भारतीय हवामान खात्याने एक नवीन अंदाज जारी केला आहे.
हवामान खात्याने अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढेल असे म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
बंगालच्या उपसागरात अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून याचा परिणाम म्हणून आज राज्यातील कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज आहे.
उद्यापासून कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. 19 तारखेपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भात मात्र आजही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
तसेच उद्यापासून विदर्भातील बहुतांशी ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज देण्यात आला आहे. गोव्यात पुढील तीन-चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात ही पुढील चार-पाच दिवस काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, वर्धा, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.