Havaman Andaj 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर फारचं कमी झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसांमध्ये अर्थातच एक ते तीन सप्टेंबर दरम्यान राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला होता. मात्र तदनंतर पावसाचा जोर कमी झाला.
जवळपास चार ते पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर तयार झाला. या लो प्रेशरमुळे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आणि सात ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस झाला.
पण, आता पुन्हा एकदा राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. अशातच, ज्येष्ठ हवामान अभ्यासक आणि हवामान खात्यातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी 17 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी राज्यात उद्यापासून पावसाला पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. राज्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि जवळपास 29 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
17 सप्टेंबरपासून विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे. उद्यापासून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे.
तसेच 20 सप्टेंबर पासून धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील पाच आणि पश्चिम महाराष्ट्रातील अर्थातच पुणे विभागातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे.
विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या काळात मात्र कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. महत्त्वाची बाब अशी की, हे हवामान जवळपास 29 सप्टेंबर पर्यंत असेच कायम राहील असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.