Pune Railway News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर, आयटी हब अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील प्रवाशांसाठी रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर, दरवर्षी फेस्टिवल सीझनमध्ये म्हणजेच सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.
प्रवाशांची हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी रेल्वे प्रशासन अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडत असते. यंदाही प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते दानापूर आणि पुणे ते गोरखपुर दरम्यान रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान, आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार, या गाडीचा रूट नेमका कसा राहणार? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार?
पुणे दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. ही गाडी या काळात दररोज पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी साडेतीन वाजता सोडली जाणार आहे आणि ही ट्रेन तिसऱ्या दिवशी दोन वाजता दानापूर रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात म्हणजेच दानापुर पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन दानापुर रेल्वे स्थानकावरून सकाळी साडेपाच वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सव्वा सहा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-दानापूर विशेष एक्सप्रेस ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या विशेष एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
पुणे-गोरखपुर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक कसे राहणार?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष एक्सप्रेस ट्रेन २२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी पुण्यातून रोज सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी सोडले जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही स्पेशल ट्रेन गोरखपुर रेल्वे स्थानकावरून या काळात रोज सायंकाळी साडेपाच वाजता सोडले जाणार आहे आणि ही गाडी तिसऱ्या दिवशी मध्यरात्री सव्वातीन वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-गोरखपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या विशेष एक्सप्रेस ट्रेनला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, कानपूर, लखनौ, गोंडा, बस्ती या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.